Pune Dengue Chikungunya Cases : शहरात डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हवामानातील वाढती आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कीटकजन्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ४८५ संशयित रुग्ण आढळले. डासांची पैदास रोखण्याबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या २,२३१ घरांना व संस्थांना पुणे महापालिकेकडुन नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सप्टेंबरच्या अवघ्या पहिल्या काही दिवसांतच ७६ संशयितांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने ऑगस्टमध्ये २१ जणांना डेंग्यूची आणि १४ जणांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत चिकनगुनियाचे केवळ ७ रुग्ण होते; मात्र एकट्या ऑगस्ट महिन्यात ही संख्या कैकपटींनी अधिक झाली आहे.

पुणे महापालिकेने ‘हॉटस्पॉट’ भागात धूरफवारणी आणि डास प्रतिबंधक मोहीम तीव्र केली आहे. ‘शहरात रुग्ण आढळताच त्याच्या घराभोवती तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत,’ अशी माहिती पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

‘सध्या महापालिका बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी १५ ते २० टक्के रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत. विशेषतः मधुमेह, हृदयविकार, किडनीचे आजार आणि कर्करोग यांसारख्या सहव्याधी असणाऱ्या रुग्णांमध्ये डेंग्यू किंवा चिकनगुनियामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होत आहे,’ अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

तीव्र ताप, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, सांधेदुखी, बीपी कमी होणे, प्रचंड अशक्तपणा आणि उलट्या ही लक्षणे आढळल्यास रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काय काळजी घ्यावी?

  • सलग दोन ते तीन दिवस ताप येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • याच काळात प्लेटलेट्स कमी होणे किंवा गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नका.
  • पोटदुखी, उलट्या किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास वैद्यकीय मदत घ्या.
  • मुबलक पाणी, द्रवपदार्थ आणि पौष्टिक आहारावर भर द्या.