पुणे : पावसाने जोर धरताच शहरात डेंग्यूचाही प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अवघ्या दीड महिन्यांत ३०० संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. एक जानेवारी ते १५ जुलै २०२६ या कालावधीत शहरात ४७३ संशयित डेंग्यूरुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी १७५ रुग्ण जूनमध्ये, तर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात १२५ रुग्ण आढळले आहेत. वारजे, कर्वेनगर, कोथरूड या भागात सर्वाधिक डेंग्यूरुग्णांची संख्या आहे.

डेंग्यूरुग्णांच्या महिनानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास जानेवारीत २५, फेब्रुवारीत २३, मार्चमध्ये २६, एप्रिलमध्ये ४१ आणि मे महिन्यात डेंग्यूचे ५८ संशयित रुग्ण आढळले. मात्र, जूनमध्ये ही संख्या थेट १७५ वर पोहोचली. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या केवळ १५ दिवसांत १२५ संशयित रुग्णांची भर पडली आहे. हा वाढीचा वेग कायम राहिल्यास पुढील काही आठवड्यांत डेंग्यूचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

प्रभागनिहाय आकडेवारीत वारजे-कार्वेनगर (४६) हा भाग संशयित रुग्णांसह आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ कोथरूड (४५), नगर रोड-वडगावशेरी (४४), औंध-बाणेर (४३) आणि धनकवडी-सहकारनगर (४२) या भागांमध्येही रुग्णसंख्या चिंताजनक आहे. कोंढवा-येवलेवाडी (३२), कसबा-विश्रामबागवाडा (३०) आणि येरवडा-कळस-धानोरी (२८) या भागांतही डेंग्यूचा प्रभाव दिसत आहे. तुलनेने केशवनगर (८) आणि बिबवेवाडी (११) येथे संशयित रुग्णांची संख्या कमी आहे.

साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यूचा धोका पावसामुळे विविध ठिकाणी साचणारे पाणी, त्यातून होणारी डासांची पैदास आणि बदलते हवामान यामुळे डेंग्यूचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घराच्या तसेच परिसराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे, पाणी साचू न देणे, डासांपासून संरक्षण करणारे उपाय करणे आणि ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना किंवा तीव्र अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.