पुणे : शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येने सप्टेंबरमध्ये यंदाच्या वर्षातील उच्चांक गाठला असताना, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पुणे महापालिकेने आता बांधकाम क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या सप्टेंबरमधील अहवालानुसार, शहरात ३,३४८ दूषित कंटेनर आढळले असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ४०२ नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

‘आरोग्य विभागाला सहकार्य न करणाऱ्या ६०० हून अधिक बांधकाम आस्थापनांची यादी बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे,’ अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.

महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने सप्टेंबरमध्ये शहरात ३ लाख ९८ हजार ९३० कंटेनर तपासले. त्यापैकी ३,३४८ कंटेनर दूषित आढळले. तसेच, २,४१२ घरांत डासोत्पत्तीची नोंद झाली. या कारवाईत १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक दूषित घरे (५९९) आणि कंटेनर (७२४) आढळले. कोथरूडमध्ये ३९५, तर कोंढवा-येवलेवाडीमध्ये ४१७ दूषित कंटेनरची नोंद झाली. शहरात २७,७५९ घरांमध्ये धूरफवारणी, तर ५३,२१२ घरांमध्ये औषधफवारणी करण्यात आली.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी नुकतीच विविध विभागांची समन्वय बैठक घेऊन डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बांधकामांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्यास प्रथम नोटीस दिली जाते. त्यानंतरही परिस्थिती कायम राहिल्यास डासांची उत्पत्ती नष्ट करून शुल्क वसूल केले जाते. शुल्क भरण्यास नकार देणाऱ्या बांधकाम आस्थापनांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.

कोथरूडमध्ये सर्वाधिक रुग्ण का?

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये डेंग्यूचे रुग्ण विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आढळले. या भागासह नगर रस्ता आणि औंध-बाणेरमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. स्लॅबच्या क्युअरिंगसाठी साठविलेले पाणी आणि बांधकाम परिसरात दीर्घ काळ साचून राहणारे पाणी डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरू शकते. त्यामुळे या भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले की,जूनच्या तुलनेत सप्टेंबरमधील रुग्णसंख्या सुमारे साडेसहा पट जास्त आहे. दर वर्षी सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढतात. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी गोदामे, पाइपलाइन आणि उघड्यावर ठेवलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचू न देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही गच्चीवरील जुनी टायर, रंगांचे डबे आणि रिकामी भांडी काढून टाकावीत. तसेच, कूलर, फ्रिज आणि वातानुकूलन यंत्रांमध्ये पाणी साचू देऊ नये.