पुणे : ठेवीदारांची दोन कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करुन पसार झालेल्या ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीच्या संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी सचिन खडतरे (रा. करकंब पंढरपूर, सोलापूर), प्रसाद कुलकर्णी (वय ३६ रा. सारंग सोसायटी नांदेडसिटी पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खडतरे, कुलकर्णी यांना शेअर बाजारा गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते.
आरोपींनी ठेवीदारांकडून दोन कोटी ३८ लाख रुपये घेतले होते. आरोपींनी कंपनीच्या संकेतस्थळावर ठेवीदारांना परतावा मिळाल्याचे भासविले होते. मात्र, प्रत्यक्षात ठेवीदारांना परतावा देण्यात आला नव्हता. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपी परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘लूक आऊट नोटीस’ बजाविण्यात आली होती.
आरोपी सचिन खडतरे आणि प्रसाद कुलकर्णी हे ३० डिसेंबर रोजी शारजा ते हैद्राबाद विमान प्रवास करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक हैद्राबादला रवाना झाले. हैद्राबाद विमानतळ परिसरात सापळा लावून दोघांना अटक करण्यात आली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक निरीक्षक चेतन मोरे, राजेश लांघी, विनोद चव्हाण, मुसळे यांनी ही कारवाई केली. आरोपींना अटक करून पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
फसवणुकीचे प्रकार वाढले
ऑनलाइन व्यवहार, गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. फसवणूक प्रकरणात ठेवीदारांची पैसे परत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. २०२१ मध्ये फसवणुकीचे ६३४ गुन्हे दाखल झाले होते. २०२२ मध्ये हा आकडा वाढून ९३० झाला होता. २०२३ मध्ये ९८२ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
२०२४ मध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. २०२४ मध्ये एक हजार ८१३ गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले. २०२५ मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली. गेल्या वर्षी एक हजार ४५९ फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २०२५ मध्ये फसवणूक प्रकरणातील सहा कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम परत मिळवण्यात आली आहे.
