पुणे : ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे ‘ या उक्तीप्रमाणे शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे यासाठी विविध पातळ्यांवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र अनेक भागात आवश्यक त्या प्रमाणात स्वच्छता होत नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी गेल्या काही महिन्यापासून मतदार संघ स्वच्छ रहावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार रासने याबाबत घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण तसेच स्वच्छतेच्या संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतात आणि त्यांना आवश्यक त्या सूचना करतात.
स्वच्छतेच्या या मोहिमेत आता नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी देखील लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ‘शहरातील अनेक स्वच्छतागृहांची स्वच्छता नियमित होत नाही. तसेच, कचरादेखील वेळेवर उचलला जात नाही, ही गंभीर बाब आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना स्वच्छताही त्या पद्धतीनेच झाली पाहिजे,’ अशा शब्दांत उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले.
पुणे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसत असल्याचे सांगत ‘शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये प्रशासन कमी पडल्यास वेळप्रसंगी झाडूदेखील हाती घेऊ,’ असेही उपमहापौर वाडेकर यांनी महापालिका प्रशासनाला सुनावले.
उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वाडेकर यांनी विविध भागांना भेट देऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याबरोबर त्यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या भागाची सकाळी पाहणी केली. आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, आरोग्य निरीक्षक प्रवीण दरेकर, मुकादम संतोष शेलार, सिद्धार्थ बागुल या अधिकाऱ्यांसह आरोग्य कोठ्यांना भेटी दिल्या.
त्या वेळी संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता, आरोग्य निरीक्षकच उपस्थित नसल्याचे आढळले. या भागात असलेल्या ५४ सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ २३ कर्मचारी हजर होते. कर्मचाऱ्यांची मागील हजेरीची पाहणी केली असता, प्रत्यक्षात १०० टक्के कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. यावरूनदेखील उपमहापौर वाडेकर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.
उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा गंभीर विषय असून, याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक स्वच्छतागृहे नियमित स्वच्छ केली जात नाहीत. कचरादेखील नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा, कोणाचीही गय केली जाणार नाही.

