२३ गावं पुणे महापालिकेच्या हद्दीत, कोणती गावं आहेत ही? जाणून घ्या!

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

PMC
पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने ते आता राज्यातलं सर्वात मोठं आणि देशातलं सातव्या क्रमांकाचं मोठं शहर ठरलं आहे.

महापालिका हद्दीमध्ये गावे समाविष्ट करण्याचा निर्णय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबद्दलची अधिसूचनाही आता जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये नव्याने हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या नावांची यादी आहे. जाणून घेऊया कोणती गावं आहेत ही!

खालील गावं आता पुणे शहरात समाविष्ट करण्यात आलेली आहेत- म्हाळुंगे ,सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

वरील सर्व गावांच्या संपूर्ण महसूल क्षेत्राचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा- गावांच्या समावेश प्रक्रियेला गती

महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जानेवारी महिन्यात काढली होती. त्यानंतर गावांच्या समावेशाबाबत हरकती-सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. हरकती-सूचनानंतर प्रत्यक्ष सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठविण्यात आला. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये गावांचा समावेश तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समाविष्ट गावांतील शाळा, अंगणवाडय़ासंह सर्व आस्थापना आणि कार्यालयांच्या जागा महापालिके कडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याला सर्व विभागांनी मान्यता दिली. नगरविकास, महसूल, ग्रामविकास विभागाकडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.महापालिका हद्दीमध्ये सर्व गावांचा एकाच वेळी समावेश करण्यात येऊ नये. गावांचा समावेश टप्प्याटप्याने करण्यात यावा, अशी भूमिका भाजपची होती. समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने राजकीय दृष्टयाआगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच गावांच्या समावेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune description of areas to be included in pune city vsk