पुणे : एकमेकांकडे बघण्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून, तसेच तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.
नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत नयन याच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अल्पवयीन मुले आणि नयन हे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाला होता. सोमवारी (४ मे) रात्री सव्वानऊच्या सुमारास नयन आंबेगाव पठार येथील निलगिरी चाैकात थांबला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू घातला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलस निरीक्षक कैलास काेडग. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, मिथुन परदेशी, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, प्रियंका निकम, सचिन सरपाले, मितेश चोरमले, महेश बारावकर, किरण साबळे, तुकाराम सुतार, मंगेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.
