पुणे : गणेशोत्सवात सर्वांनाच ढोल-ताशा पथकांचे आकर्षण असले, तरी निवासी भागात सराव केला, तर त्याचा आसपासच्या रहिवाशांना त्रास होण्याची शक्यता असते. आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून अनेकदा केली जाते. यंदाही अशा तक्रारी होत आहेत.

या बाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, ‘वादनासाठी सरावाच्या जागा या लोकवस्तीपासून दूर असाव्यात. उच्च न्यायालयानेही या बाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवासी भागात ४५ ते ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणे बेकायदा आहे. नागरिकांना अधिकच्या आवाजाबाबत पोलिसांत तक्रार करता येते. आता मोबाईल ॲपवरही आवाज मोजण्याची सोय आहे. आवाजाच्या ठिकाणीच ध्वनी प्रदूषण न मोजता, लोकवस्तीजवळ किती आवाज येतो, हे मोजणे गरजेचे असते. त्यानुसार नागरिकांनी पोलिसांत तक्रार करायला हवी.’

‘नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी’

‘वादनातून आवाज निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. बहुतांश पथके मध्यवर्ती शहरातून बाहेर किंवा मोकळ्या मैदानांवर गेली आहेत. तसेच, सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या वेळेत सराव संपविण्याचे स्पष्ट निर्देश पथकांना देण्यात आले आहेत,’ अशी माहिती ढोल-ताशा महासंघाकडून देण्यात आली.

‘पथकांमध्ये ढोलांची संख्या नियंत्रित ठेवणे, एकाच परिसरात जास्त आवाज होऊ नये म्हणून शेजारी-शेजारी सराव असणाऱ्या पथकांना जागा आणि वेळ विभागून सराव करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत,’ असे ढोल-ताशा महासंघाचे कायदेशीर सल्लागार शिरीष थिटे यांनी सांगितले.

कायदा काय सांगतो ?

  • ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. शांत आणि ध्वनी प्रदूषणमुक्त जागेत राहण्याचा मूलभूत अधिकारी आहे.
  • कोणाला यंत्राद्वारे किंवा कृत्रिम पद्धतीने आवाज करत नागरिकांवर ऐकण्याची सक्ती लादता येत नाही.
  • रहिवासी भागात ४५ ते ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करता येत नाही. त्यापेक्षा जास्तीचा आवाज म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे.
  • अधिकचा आवाज करण्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असते.

तक्रार कुठे करायची?

  • पोलिसांत तक्रार : आवाज जास्त असेल तर थेट जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकता.
  • पुरावा ठेवा : आता मोबाईल ॲपवरही डेसिबल मोजता येतो. पण लक्षात ठेवा – जिथून आवाज येतो नेमक्या त्याच जागी म्हणजे गोंगाटाच्या ठिकाणी आवाजाची तीव्रता मोजायची नसते. तर तुमच्या घराजवळ, लोकवस्तीत किती आवाज येतो, हे मोजणे महत्त्वाचे आहे. तक्रारींसाठी हा महत्वाचा पुरावा आहे.

दरम्यान, ढोल-ताशा महासंघाने नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन वाद्य पथकांना केले आहे. त्यामुळे आधी पथकांशी बोलून बघा. त्यानंतरही अधिकच्या आवाजाचा त्रास होत असेल, तर थेट पोलिसांत तक्रार करता येते. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणाविरोधात न्यायालयातही दाद मागता येते, अशा सूचना कायदेशीर सल्लागार देतात.