पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ढोल-ताशा पथकांच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील विविध पथकांचे वादक कसून सराव करीत असून, पथकांमध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे. वादकांमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण, ‘आव्वाजा’चे भान ठेवण्याची गरजही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातील मानाचे पान. मानाच्या गणपतींसह अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरुपात आणि घरोघरी गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. ढोल-ताशा पथके आणि त्यांचे आकर्षक वादन हा या उत्सवातील सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सोहळा. कर्णकर्कश्श डीजे, लेझर बीम यांच्यापेक्षा ढोल-ताशा पथकांची शिस्त आणि त्यांची लयबद्धता सर्वांचे लक्ष वेधून घेते. मानाच्या गणपतींसमोरचे वादन हा या पथकांसाठीचा सर्वोच्च आनंदाची अनुभूती देणारा क्षण. याबरोबरच प्रत्येक मंडळासमोर अनेक पथकांचे वादन होते.

गणेशोत्सवातील वादन लयबद्ध आणि आनंदाची अनुभूती देणारे व्हावे, यासाठी त्याची तयारी जवळपास दोन महिने आधी सुरू होते. सरावामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण सहभागी होतात. अनेक पथकांमध्ये त्यासाठी नोंदणी होते आणि सरावाला सुरुवात होते. सध्या नदीपात्रातील मोकळी जागा, सणस मैदान आणि मध्यवर्ती भागाबरोबरच कोथरूड, सिंहगड रोड, सहकारनगर, कात्रज, पद्मावती अशा वेगवेगळ्या भागांत वाद्यपथकांचा सराव सुरू आहे. या वर्षी १८ ते २२ वयोगटातील तरुणांचा ढोल-ताशा पथकांतील सहभाग लक्षणीय असून, पुण्यात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजमाध्यमांवरील रील्स बघून काही मुले-मुली पथकांमध्ये नव्याने सहभागी होत आहेत. तर, भाऊ-बहीण किंवा मित्रांबरोबरही अनेकजण वादनाला जात आहेत.

लयबद्ध आणि सुमधूर वादन वाटते तितके सोपे नसते. ढोल-ताशा वादनामागे ताल आणि लयाचे भान असणे आवश्यक आहे. वादनाबरोबरच तालबद्ध निनाद आणि त्या आधारावर पथकातील तरुणांचे सादरीकरण हे सारेच विलोभनीय. पथकातील या तरुणांच्या वादनाच्या शिक्षणाबाबत ढोल-ताशा महासंघाचे पदाधिकारी शिरीष थिटे म्हणाले, ‘तरुण मुलांमध्ये ढोल-ताशा वादनाचे आकर्षण वाढले आहे. मात्र, हे केवळ रील्सपुरते मर्यादित नाही. ही मुले चाळीस-पन्नास वर्षांपासून वादन करणाऱ्या ज्येष्ठ वादकांकडून वादनाचे धडे घेतात. तसेच, वेगवेगळी पथके एकत्र येऊन एकमेकांच्या वादनाची शैली शिकतात.’

‘दोन वर्षांपूर्वी नदीपात्रात अचानक आलेल्या पाण्यामुळे पथकांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रसंगातून धडा घेऊन नदीपात्रात सराव करणाऱ्या पथकांकडून दक्षता बाळगण्यात येत आहे. यंदा धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे वाद्ये वेळीच सुरक्षितस्थळी हलवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. काही पथकांची वाद्ये मात्र वाहून गेली,’ असेही त्यांनी सांगितले.