पुणे : शहरात ढोल-ताशा पथकांचा खडतर सराव सुरू झाला आहे. मात्र, यंदा या जल्लोषाला आरोग्य समस्येची किनार आहे. धावपळीची जीवनशैली आणि बिघडलेल्या आहारपद्धतीमुळे वादकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ढोल-ताशा पथक महासंघाने प्रथमच हाती घेतलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेतून एक धक्कादायक बाब समोर आली असून, दर दहा वादकांमध्ये दोघांना आरोग्य समस्या असल्याचे आढळले आहे. तासन्तास चालणाऱ्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या या सरावात ही आकडेवारी सर्वच वादकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. घटलेले हिमोग्लोबिनचे प्रमाण, वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या आढळल्या आहेत. आरोग्य तपासणी करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी याविषयी अधिक माहिती दिली.
ढोल-ताशा महासंघ, पुणे शहर समिती यांच्या वतीने सह्याद्री सरस्वती कराड हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. दर वर्षी कुठल्या ना कुठल्या पथकात तपासणी होते. परंतु, या वर्षी शहरातील सर्व पथकांतील मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. तपासणीत सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, ब आणि ड जीवनसत्वे, उंची आणि वजन तसेच रक्त गट तपासणी यांचा समावेश आहे.
पुण्यात एकूण १७० पथके आहेत. प्रत्येक पथकात सरासरी २०० मुले असतात. त्यानुसार एकूण अंदाजे पंधरा हजार मुले असून, ही सर्व मुले १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील आहेत. या वादकांची ही तपासणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक वादकांची तपासणी झाली असून, दर दहा जणांमागे दोघांना आरोग्य समस्या उद्भवत असल्याचे आढळले आहे.
पालकांचीही तपासणी
या आरोग्य चळवळीत केवळ वादकच नाहीत, तर त्यांच्या पालकांचाही तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये पालकांच्या आरोग्यविषयकही समस्या समोर आल्या आहेत. तपासणी केलेल्या जवळपास ३० ते ३५ टक्के पालकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या आरोग्य समस्या असल्याचे तपासणी पथकातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
‘सीपीआर’चे प्रशिक्षण
गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कोणाला त्रास झाला, तर त्यांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ यांच्या वतीने ‘संजीवनी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ढोल-ताशा पथकातील वादकांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण दिले जात आहे. १६ ऑगस्टपासून हे प्रशिक्षण दिले जात असून, आठशेहून अधिक वादकांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. अलका क्षीरसागर यांनी दिली.
वादकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सराव करताना आणि त्यानंतरही त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी यंदा प्रथमच हजारो वादकांच्या आरोग्य तपासणीचा विडा उचलला आहे. टप्प्याटप्प्याने १५ हजार वादकांच्या शारीरिक चाचण्या करण्यात येत आहे. अशी माहिती ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र कार्यकारिणी खजिनदार शिरीष थिटे यांनी दिली.
सरस्वती कराड रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी सांगितले की,आतापर्यंत अडीच हजार मुलांच्या तपासण्या झाल्या असून, दर दहा मुलांमागे दोघांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण असमाधानकारक आहे. तसेच, शरीरात चरबीचे प्रमाण अधिक आढळले आहे. याशिवाय, मुलांमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता आहे. पालकांमध्येही काही व्याधी असून, हे प्रमाण शंभरमागे तीस ते पस्तीस असे आहे. या माध्यमातून आरोग्याविषयक जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी उचललेले हे पाऊल आहे.
