पुणे : ‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सराव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्याव्यात. सरावासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यादेखील पथकांना उपलब्ध करून दिल्या जाव्यात,’ अशी सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला केली आहे.
‘सरावासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेताना सराव पथकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाने एक खिडकी व्यवस्था करून सर्व आवश्यक परवानग्या त्या माध्यमातून कशा दिल्या जातील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
ढोल-ताशा पथकांना सरावाची परवानगी ऑफलाईन आणि ऑनलाईनदेखील देण्याची व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे. सरावाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सुविधादेखील उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे,’ असेही महापौर नागपुरे यांनी सांगितले.
‘पोलिसांशी समन्वय ठेवा’
‘ढोल-ताशा पथकांकडून सुरू असलेल्या सरावादरम्यान ध्वनिप्रदूषण, वेळेची मर्यादा आणि वाहतुकीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्याच वेळी सांस्कृतिक परंपरेलाही प्रोत्साहन मिळेल, यामध्ये योग्य समतोल साधणे आवश्यक आहे,’ असे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, ढोल-ताशा पथके शहराच्या परंपरेचा अविभाज्य भाग असून, हजारो युवक-युवती शिस्त, संस्कार आणि सांघिक भावनेतून या लोककलेचे जतन व संवर्धन करीत आहेत. ढोल-ताशा पथके ही ‘पुण्याची सांस्कृतिक ओळख आहे. ही ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पथकांना प्रोत्साहन आणि आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे.
ढोल पथकांकडून शुल्क घ्या
दरम्यान, ‘महापालिका प्रशासन पथारी व्यावसायिक व इतरांना सशुल्क परवानगी देते. ढोलपथकेदेखील व्यावसायिक आहेत, एकही पथक मोफत वादन करत नाही. त्यामुळे ढोल पथकांना रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे. महापालिका आयुक्तांना तसे निवेदन देणार आहे,’ असे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी सांगितले.
ढोल ताशा पथकांची मनमानी थांबवा
नदीपात्रासह शहरातील अनेक पदपथांवर आणि मोकळ्या जागांवर ढोल ताशा पथकांनी गेल्या पंधरा दिवसापासून सराव सुरू केला आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पथकांचा सराव सुरू होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. पथकातील मंडळी एकाच वेळी १०० ढोल वाजवतात. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्यांच्या आवाजाचा त्रास होतो. सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांनाही ढोल पथकांच्या मनमानी कारभाराचा त्रास होतो. याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेत जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने वेळीच ढोल ताशा पथकांवर बंधन न ठेवल्यास येणाऱ्या काळात त्यांची मनमानी अधिक वाढेल आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिकच अवघड होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
