पुणे : खग्रास चंद्रग्रहण, तसेच धुळवडीच्या दिवशी सायंकाळपर्यंत पौर्णिमेमुळे सामिष खवय्यांचा हिरमोड झाला. ग्रहणामुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीवर परिणाम झाला. धुळवडीच्या दिवशी मटण, मासळी, चिकनला बेताची मागणी राहिली.

होळी पौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी धुळ‌वडीला अनेक जण सामिष पदार्थांचा आस्वाद घेतात. धुळवडीच्या दिवशी मटण, मासळी, चिकनच्या दरात मोठी वाढ होतृी. यंदा धुळवडीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आले. धुळवडीच्या दिवशी सायंकाळपर्यंत पौर्णिमा असल्याने मटण, मासळी, चिकनच्या मागणीवर परिणाम झाला. सायंकाळी ग्रहण, तसेच पौर्णिमेला सांपल्यानंतर काही प्रमाणात मटण, मासळी, चिकनला मागणी राहिली. चिकनच्या दरात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली.

गणेश पेठेतील मासळी बाजारात मंगळवारी (३ मार्च) खोल समुद्र, नदी, खाडी, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन मासळी अशी एकूण मिळून २५ ते ३० टन मासळीची आवक झाली. धुळवडीला मासळीला बेताची मागणी राहिली. मासळीची दर स्थिर आहेत’, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

‘मंगळवारी एक हजार ते १२०० बोकडाची वक झाली. चंद्रग्रहण आणि धुळवडीच्या दिवशी असलेल्या पौर्णिमेचा विक्रीवर परिणाम झाला’, असे पुणे शहर मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी नमूद केले. ‘ चंदग्रहण आणि पौर्णिमेमुळे मागणी परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे चिकन विक्रेत्यांनी नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणावर खरेदी केली.दरवर्षी धुळवडीला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण मिळून ११०० टन चिकनची विक्री होते. यंंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ७०० टन चिकनची विक्री केली. धुळवडीच्या दिवशी सकाळपासून खरेदीसाठी गर्दी व्हायची. यंदा मात्र, धुळवडीला फारशी गर्दी नव्हती. सायंकाळी सहानंतर खरेदीसाठी थोडी गर्दी झाली, ’ असे पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

चिकन, मटण, मासळीचे किलोचे दर

मटण – ८०० रुपये
चिकन – २४० रुपये
पापलेट – ११०० ते २००० रुपये
सुरमई – ८०० ते १००० रुपये
ओले बोंबील – ३०० ते ४०० रुपये
कोळंबी – ३२० ते ८५० रुपये
हलवा – ६५० ते ८०० रुपये
रावस – ७५० ते ८५० रुपये