पुणे : तेलामुळे प्रदूषित झालेल्या जलस्रोतांचे शुद्धीकरण करण्यासाठी संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेतील (डाएट) शास्त्रज्ञांनी शैवालावर आधारित अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या सूक्ष्म शैवालांचा (मायक्रोअल्गी) वापर करून तेलामुळे प्रदूषित जलस्रोत स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धतींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
औद्योगिक अपघात, वाहतूक दुर्घटना, जागतिक संघर्षामुळे ऊर्जा सुविधांचे झालेले नुकसान, अशा विविध कारणांनी तेलगळतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नद्या, तलाव आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षणाचे पर्यावरणीय आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेलामुळे प्रदूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. ‘डीआयएटी’तील धातुकर्म व पदार्थ अभियांत्रिकी विभागाचे प्रा. बालसुब्रमणियन के. यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन अशाच प्रयत्नांचा भाग आहेत.
सूक्ष्म शैवालांमध्ये पेट्रोलियमजन्य प्रदूषणकारी घटक टिपण्याची, शोषून घेण्याची आणि कालांतराने त्यांचे जैवविघटन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्याचबरोबर ते जलपरिसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये ‘स्पिरुलिन’ (निळ्या-हिरव्या रंगाचे शैवाल) या शैवालाने अवघ्या २४ तासांत जड हायड्रॉलिक तेलापैकी जवळपास ९० टक्के तेल शोषून घेतल्याचे आढळून आले.
या संशोधनाचा विस्तार आता डिझेल आणि पेट्रोलवरील प्रयोगांपर्यंत करण्यात येत आहे. प्रा. बालसुब्रमणियन यांनी नुकत्याच प्राप्त झालेल्या एचपी इनोव्हेशन ग्रीन ॲवॉर्डच्या पुढील टप्प्यात या संकल्पनेसाठी एकाधिकार (पेटंट) प्राप्त करण्यासाठीचा अर्ज दाखल केला आहे.रासायनिक पदार्थांचा किंवा अधिक ऊर्जा लागणाऱ्या प्रक्रियांचा वापर करणाऱ्या पारंपरिक तेलगळती नियंत्रण पद्धतींच्या तुलनेत संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचे हे तंत्रज्ञान अधिक शाश्वत आणि पर्यावरणाशी सुसंगत आहे.
या संशोधनाच्या पुढील टप्प्यात अत्याधुनिक त्रिमितीय (थ्रीडी) प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जैवविघटनशील जैवमिश्रित (बायोहायब्रिड) पदार्थ विकसित केले जात असून, त्यांचा वापर तरंगत्या तेलशुद्धीकरण व्यासपीठांमध्ये, सच्छिद्र फिल्टरमध्ये आणि नद्या, तलाव, तसेच किनारी भागांतील जलशुद्धीकरण प्रणालींमध्ये केला जाणार आहे.
तेलगळती नियंत्रण मोहिमांना बळकटी
निसर्गातून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण, शाश्वत जलव्यवस्थापन आणि भविष्यातील तेलगळती नियंत्रण मोहिमांना बळकटी देण्यास उपयुक्त ठरेल. तसेच, स्वच्छ जलपरिसंस्था निर्माण करण्यासाठीही त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे. हे संशोधन राष्ट्रीय आणि जागतिक पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या ‘डीआयएटी’च्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे, अशी माहिती संस्थेने दिली.
