पुणे : गवताळ कुरणांना लागणाऱ्या वणव्यात बहुतांश वनस्पती भस्मसात होतात. मात्र, वणव्यांमध्ये तगून राहून पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतींचा शोध नुकताच संशोधकांनी लावला आहे. ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’ असे नाव असलेली वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेजवळच्या गवताळ कुरणांमधून शोधण्यात आली आहे. वनस्पती अभ्यासक आदित्य धारप यांच्यासह आघारकर संशोधन संस्थेमधील डॉ. मंदार दातार आणि भूषण शिगवण यांनी या वनस्पतीचे संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध इंग्लंडमधून प्रकशित होणाऱ्या ‘क्यू बुलेटिन’ नावाच्या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. लंडनच्या क्यू बॉटॅनिक गार्डन येथील जागतिक कीर्तीचे वनस्पती तज्ज्ञ डॉ. आयेन डर्बीशायर यांनीही या वनस्पतीच्या नवे असण्याला दुजोरा दिला. आगीशी सामना करून जिवंत राहणाऱ्या काही निवडक वनस्पतींमध्ये ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’ या वनस्पतीचा समावेश होतो. इंग्रजीत या वैशिष्ट्याला ‘पायरोफायटिक’ असे म्हणतात. आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानी, गवताळ प्रदेशात आगीच्या प्रकोपानंतर फुलोऱ्यावर येऊन आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वत:साठी उपयोग करून घेणाऱ्या अनेक वनस्पती आढळतात. मात्र, भारतातून आणि नोंदल्या गेलेल्या थोड्याच वनस्पतींमध्ये ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’चा समावेश होतो. हेही वाचा - भावी डॉक्टरांच्या आत्महत्या वाढल्या! सरकारनं त्या रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल ‘पायरोफायटिक’ प्रकारातील या वनस्पती फुलण्यासाठी किंवा बीजप्रसारासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून असतात. मात्र, ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’ फुलण्यासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून न राहता आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग करून घेते. या वनस्पतीचे फुलण्याचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात पावसानंतर साधारण नोव्हेंबर महिन्यात ही पहिल्यांदा फुलायला लागते. हिवाळा सरताना अनेक ठिकाणी स्थानिकांकडून किंवा शिकाऱ्यांकडून वणवे लावले जातात. अशा वेळी या वणव्यात बहुतांश गवत, झुडपे पूर्णतः जळून जातात. अशा परिस्थितीत ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’चे अस्तित्व निव्वळ जमिनीखालील जाडजूड मुळापुरतेच शिल्लक राहते. बऱ्याच वनस्पती अशा वणव्यानंतर पावसाळ्याच्या पहिल्या सरीची वाट बघत निद्रितावस्थेत जातात. मात्र ‘डिक्लीपटेरा पॉलिमॉर्फा’ला अशा आगीच्या प्रकोपानंतर काहीच दिवसांत एप्रिल-मेच्या दरम्यान परत धुमारे फुटतात. हे धुमारे बरेचदा फक्त फुले असणारे अत्यंत केसाळ पुष्पदंड असतात. आगीनंतर मुबलक उपलब्ध झालेल्या पोटॅश खताचा आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांना सहज आकर्षून घेता येईल अशा परिस्थितीचा या वनस्पतीला उपयोग होतो. या स्थितीत फुलांचे पटकन परागीभवन होऊन पावसाळ्याच्या आधी बीजप्रसार होतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर हे बुटके फुटवे लुप्त होऊन नवीन मोठे नेहमीचे फुटवे येऊन चक्र सुरू राहते, असे डॉ. दातार यांनी सांगितले. हेही वाचा - डॉक्टरांनी औषधे विकल्यास आता थेट कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेमुळे नव्या वादाला तोंड आफ्रिकेतील प्रजातींशी नाते भारतात आढळणाऱ्या ‘डिक्लीपटेरा’च्या कुठल्याच प्रजातीत अशा प्रकारे दोनदा फुलणे आजवर नोंदवले गेलेले नाही. मात्र, आफ्रिकेतल्या काही ‘डिक्लीपटेरा’च्या दोन-तीन जाती आगीनंतर फुलतात. त्यामुळे आफ्रिका खंडातल्या ‘डिक्लीपटेरा’ प्रजातींशी नाते सांगणारी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ठरते, असे आदित्य धारप यांनी सांगितले.