पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्याची आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी संबंधित यंत्रणेला केली.
दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय निकष आणि सुधारित कार्यपद्धतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, कृषी विभागाच्या रूपाली बंडगर, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ तसेच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, पुरवठा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा टंचाई आराखडा करण्याची सूचना राऊत यांनी केली. तसेच, ज्या धान्याचे उत्पादन कमी झाले असेल त्याची साठेबाजी होणार नाही, यावर नियंत्रण ठेवावे, चारा पीक क्षेत्राचा अंदाज घ्यावा, पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागावर लक्ष केंद्रीत करावे,’ असे राऊत यांनी स्पष्ट केले.
बैठकीत तालुकानिहाय पर्जन्यमानाची ठळक वैशिष्ट्ये, तालुकानिहाय पावसाचा थंड कालावधी, खरीप हंगामातील पिकांची स्थिती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची तालुकानिहाय अहवाल, फळ पीकविमा योजना मृगबहार तालुकानिहाय अहवाल, पीक कापणी वेळापत्रक, धरणातील पाणीसाठा, भूगर्भातील पाणीपातळी, चारा पीक क्षेत्र आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
