पुणे जिल्ह्य़ातील २१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होऊन प्राथमिक अंदाजानुसार ती ६१.६ टक्क्य़ांवर पोहोचली. मतदार यादीत नागरिकांची नावे नसल्याचा मुद्दा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाजला होता. या वेळी मात्र अशा तक्रारी आल्या नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार याबाबत कमालीची उत्कंठा आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील असे दिग्गज निवडणुकीत उभे असल्याने पुण्याकडे लक्ष लागून राहिले होते. पुणे जिल्ह्य़ातील २१ मतदारसंघांमध्ये २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ५४.४४ टक्के मतदान झाले होते. त्यातही ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी अधिक होती. पुणे शहरात मात्र ४४ ते ४५ टक्क्य़ांच्या आसपास मतदान झाले होते. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्य़ातील मतदानाची टक्केवारी ५७ टक्क्य़ांच्या पुढे गेली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत किती मतदान होणार, याबाबत उत्सुकता होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्य़ात सरासरी ६१.६ टक्के मतदान झाले. यापैकी इंदापूर मतदारसंघात सर्वाधिक ७८ टक्के मतदान झाले, तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात केवळ ४२.५९ टक्के मतदान झाले.
पुण्यात गेल्या वेळी हजारो मतदारांची नावे यादीत नव्हती. त्यामुळे मोठे आंदोलन झाले होते. या तुलनेत आताच्या निवडणुकीत अशी एकही तक्रार आली नाही. बोगस मतदानाच्या प्रकारांचीही नोंद झालेली नाही, असे राव यांनी सांगितले.