पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याने निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाकडे पूर्णत: पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. २०२४-२५ मध्ये राज्याकडून पुणे जिल्ह्याला ३८ हजार ३८ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले. मात्र ८ ऑगस्टपर्यंत केवळ ६३ निरक्षरांचीच नोंदणी झाली असून, निरक्षरांना शिकवण्यासाठी आवश्यक ३ हजार ८०८ स्वयंसेवकांपैकी केवळ २२ स्वयंसेवकांचीच नोंदणी झाली आहे.

राज्यात योजना संचालनालयाकडून नवसाक्षरता अभियान २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १ कोटी ६३ लाख निरक्षर आढळून आले. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६७ हजार निरक्षर आहेत. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्याला मिळालेल्या ६३ हजार ९५० निरक्षरांच्या उद्दिष्टापैकी केवळ १२ हजार ६८४ निरक्षरांची ऑनलाइन नोंदणी झाली. त्यातील ९ हजार ८०७ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ९ हजार ४२ उत्तीर्ण झाले. त्यामुळे गेल्यावर्षीची उद्दिष्टपूर्ती साध्य झालेली नसताना आता नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – पुणे : वणव्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा तळेगाव दाभाडेनजीक शोध

योजना संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले, की लिहिता वाचता येणे आणि संख्याज्ञान एवढीच साक्षरतेची मर्यादित व्याख्या नाही. नवसाक्षरांना जीवनकौशल्ये आत्मसात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या योजनेकडे सर्वांना वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजनेचा प्रचार करावा लागणार आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: पोलीस शिपाईच्या रिक्त पदासाठी आज लेखी परीक्षा; पोलिसांचे उत्तम नियोजन, राहण्याची आणि नाष्ट्याची केली सोय

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नवसाक्षरताची जागृती

आषाढी वारीच्या निमित्ताने दोन्ही पालखी सोहळ्यात ‘वारी साक्षरतेची’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नवसाक्षरता अभियनाच्या जागृतीबाबत योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून लक्ष वेधले. तसेच उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी पुणे जिल्ह्यातील नोंदणीबाबतची स्थिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दिवसे यांनी पुढाकार घेत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व तहसीलदारांना उत्सवांमध्ये मंडळांमार्फत नवभारत कार्यक्रमाचे प्रचाराचे निर्देश दिले.