पुणे : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) दुसरी बैठक येत्या शुक्रवारी (१५ मे) पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, त्यामध्ये सन २०२६-२७ या वर्षाच्या १४७२ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. तसेच, नव्याने कोणत्या कामांचा समावेश करावा आणि कोणत्या कामांसाठी निधी उपलब्ध करावा लागणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात बैठक झाली होती. त्यामध्ये १ हजार ४७२ कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या बैठकीवेळी सुनेत्रा पवार यांनी एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही बैठक येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना निमंत्रित करण्यात आले असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन्ही महापौर, आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ‘डीपीसी’च्या सदस्यांची अद्याप निवड न झाल्याने त्यांच्या नियुक्त्या आता लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ४० सदस्यांची वर्णी या समितीवर लावली जाते. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमधून २० नगरसेवक, जिल्हा परिषदांमधून १८ तसेच नगरपालिकांमधून दोन अशा ४० सदस्यांची निवड केली जाते. पालकमंत्री ‘डीपीसी’चे अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतात. या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र, ही प्रत्यक्षात निवड न झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या संधीपासून दूर राहावे लागत असल्याची चर्चा सुरू आहे.