पुणे : आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे आर्थिक काटसकरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची आज, शुक्रवारी (१५ मे) होणारी बैठक ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्य शासनाने बैठका ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) दुसरी बैठक शुक्रवारी होणार असून, त्यामध्ये सन २०२६-२७ या वर्षाच्या १,४७२ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच, या बैठकीत जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताला अंतिम मंजुरी दिली जाणार असून, नव्याने कोणत्या कामांचा समावेश करावा आणि कोणत्या कामांसाठी निधी उपलब्ध करावा लागणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच्या नियोजनानुसार ही बैठक विधान भवनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणार होती. मात्र, सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता नगरपालिका, जिल्हा परिषद आणि अन्य सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी विधानभवनात न येता आपापल्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थिती राहणार आहेत.
दरम्यान, अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असले तरी, बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधान भवनातूनच बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आणि निवडक कर्मचारी विधान भवनात उपस्थित राहून तांत्रिक बाबींचे नियंत्रण करतील. जिल्हा नियोजन विभागाने त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
