पुणे : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या समाइक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) विद्यार्थी नोंदणी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक होत असल्याचे आहे. पुण्यातून होणाऱ्या नोंदणीचा टक्का वर्षागणिक वाढत असून, सर्वांत कमी नोंदणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सीईटीसाठीच्या नोंदणीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, विधी, हॉटेल मॅनेजमेंट, शिक्षणशास्त्र, नर्सिंग, डिझाइन अशा विविध वीस पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठी राज्यभरातील, तसेच परराज्यांतील विद्यार्थीही नोंदणी करतात. सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६च्या प्रवेश परीक्षांसाठी १४ लाख ८ हजार ३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर २०२४-२५मध्ये १३ लाख २ हजार ७०१, २०२३-२४मध्ये १० लाख ३७ हजार ५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक नोंदणी होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यातून २०२३-२४मध्ये १ लाख ३ हजार १४०, २०२४-२५मध्ये १ लाख ४२ हजार ३६७, २०२५-२६मध्ये १ लाख ४५ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यातून (अनुक्रमे ५५ हजार २५०, ७५ हजार २३८, ७९ हजार १७७) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून (५६ हजार ६२०, ७१ हजार १४९, ७७ हजार २९९) विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे नोंदणी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे १० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी एकट्या पुणे जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक नोंदणी होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे, ठाणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांखालोखाल नाशिक, नागपूर, मुंबई उपनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तर सिंधुदुर्ग, गडचिरोली, रत्नागिरी, हिंगोली, नंदूरबार, गोंदिया, वाशिम, भंडारा, वर्धा, धाराशिव या जिल्ह्यांतून होणारी विद्यार्थी नोंदणी कमी आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २०२३-२४मध्ये ३ हजार ७६४, २०२४-२५मध्ये ५ हजार ५७५, २०२५-२६मध्ये ५ हजार ५८३ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थी नोंदणीची आकडेवारी ही संबंधित जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची असली, तरी काही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रासाठी अन्य जिल्हा नमूद केलेला असू शकतो.

नोंदणीतील तफावत लक्षणीय

सर्वाधिक नोंदणी होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आघाडीवर असलेल्या पुणे आणि ठाणे या जिल्ह्यातील नोंदणीमध्येही लक्षणीय तफावत असल्याचे दिसून येते. सलग तीनही वर्षांत पुणे जिल्ह्यातून होणारी विद्यार्थी नोंदणी ठाणे जिल्ह्यातून होणाऱ्या विद्यार्थी नोंदणीच्या जवळपास दुप्पट असल्याचे चित्र आहे.

सीईटीबाबत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे. स्कूल कनेक्ट या उपक्रमात करिअर समुपदेशनासह सीईटीबाबत माहिती दिली पाहिजे. जेणेकरून राज्यभरातील सीईटी नोंदणीमध्ये वाढ होईल. तसेच दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी, खासगी शिकवणी वर्गांमुळे पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात जागृती आहे. – डॉ. एन. एस. उमराणी, माजी प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ