पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांनी पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत डंका वाजवला आहे. राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालात राज्याच्या गुणवत्ता यादीत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश असून, शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात पुणे जिल्ह्याने वर्चस्व प्राप्त केल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेने दिली.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३२ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. गुणवत्ता यादीतील सर्वाधिक सुमारे ३० टक्के विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आहेत. ३२ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद शाळांतील आहेत. तसेच, राज्यातील पहिल्या १० गुणवंतांमध्ये पुणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात जिल्हा परिषद शाळा टाकळकर वाडी येथील श्रेयस साळुंखे याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.

इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तसेच, राज्य गुणवत्ता यादीतील सर्वाधिक सुमारे ४५ टक्के विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आहेत. ५७ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद शाळांतील आहेत. राज्यातील पहिल्या दहा गुणवंतांमध्ये पुणे जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश असून आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे येथील आर्या पारेकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

‘राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी सातत्याने राज्यात अव्वल स्थान मिळवून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी ओळख निर्माण केली आहे. हे सातत्यापूर्ण यश विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि संपूर्ण शिक्षण विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे समर्पण, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाचे नियोजनबद्ध प्रयत्न आहेत,’ असे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

‘पुणे जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्यात सर्वोच्च यश संपादन करू शकतात, हे या निकालाने सिद्ध केले आहे,’ असे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी नमूद केले.

‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’मुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संकल्पनाधारित अध्ययन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देत जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सकारात्मक परिवर्तन झाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे उज्ज्वल यश म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद या पुढेही नवे आदर्श निर्माण करीत राहील. गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद