धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ धरणे काठोकाठ भरली आहेत. या धरणांमुळे कालवा किंवा नदीपात्रातून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीची पातळी वाढून पूरसदृश परिस्थिती जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, निरा देवघर आणि वीर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. पानशेत धरण भरल्यामुळे या धरणातून खडकवासला धरणात आणि या धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पवना धरणातून गुरुवारी रात्री दोन हजार क्सुसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

दरम्यान, यंदा कडक उन्हाळ्यानंतर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली नाही. तसेच मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मात्र, जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे लघु प्रकल्प असलेली धरणे दुथडी भरून वाहू लागली. जुलैच्या अखेरीस काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ धरणे काठोकाठ भरली आहेत.