पुणे : देवदर्शनावरुन परतत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिवे घाटात सोमवारी मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीवरील आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली.
उंड्री येथील गंगावणे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
दुचाकीस्वार सुंदर कैलास गंगावणे (वय ३८), त्यांची मुलगी अनन्या (वय १२, दोघे रा. उंड्री, कात्रज – कोंढवा रस्ता) अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात सोहम कैलास गंगावणे (वय ८) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी पवार यांचे मामेभाऊ सुंदर गंगावणे, मुलगी अनन्या, मुलगा सोहम यांना दुचाकीवरुन घेऊन रविवारी (२९ मार्च) जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. पुणे-सासवड रस्त्यावरुन दुचाकीस्वार गंगावणे आणि मुले सव्वाबाराच्या सुमारास निघाले होते. दिवे घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सुंदर गंगावणे, अनन्या आणि सोहम गंभीर जखमी झाले.
भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिली जोरदार धडक
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ढावरे, उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘ गंभीर जखमी झालेले सुंदर, अनन्या, सोहम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोहम याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
