पुणेः अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असली, तरी पुणे विभागातील अवयवदान चळवळीला अपेक्षित वेग आला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतून २०२६ मध्ये ३१ जुलैपर्यंत अवघे ४८ अवयवदाते मिळाले आहेत. या माध्यमातून ११५ अवयवांचे प्रत्यारोपण झाले असले, तरी विविध अवयवांच्या प्रतीक्षायादीत ३,३७८ रुग्ण आहेत.

गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता २०२१ मध्ये ४८, २०२२ मध्ये ४६, २०२३ मध्ये ५८, २०२४ मध्ये ७० आणि २०२५ मध्ये ७९ अवयवदाते मिळाले. २०२६ मध्ये जुलै महिन्यापर्यंत दात्यांची संख्या ४८ वरच आहे. २०२५ मध्ये २०७ अवयवांचे प्रत्यारोपण झाले होते, तर यंदा ३१ जुलैपर्यंत ११५ अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे.

मूत्रपिंडासाठी सर्वाधिक प्रतीक्षा

प्रतीक्षायादीत सर्वाधिक २,१९२ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापाठोपाठ ९९० रुग्णांना यकृत, ५७ जणांना हृदय आणि ३८ जणांना फुफ्फुसाची प्रतीक्षा आहे. मूत्रपिंड-यकृतासाठी २४, मूत्रपिंड-स्वादुपिंडासाठी १४, हृदय-फुफ्फुसासाठी १०, तर विविध अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ५३ रुग्ण प्रतीक्षेत आहेत. २०२६ मध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्यारोपणात ६३ मूत्रपिंड, ३९ यकृत, सहा फुफ्फुसे आणि तीन हृदयांचा समावेश आहे. दोन रुग्णांमध्ये मूत्रपिंडासह यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

एका दात्यामुळे अनेकांना जीवनदान

अवयवदानातून एका दात्याच्या अवयवांमुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे मेंदूमृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी दुःखाच्या प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेतल्यास प्रतीक्षायादीतील अनेक रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते. पुणे विभागातील मोठी प्रतीक्षायादी पाहता अवयवदानाबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि समुपदेशनाची गरज अधोरेखित होत आहे.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, या वर्षात केवळ ४४ अवयव दाते होते. त्यांच्या माध्यमातून १२६ प्रत्यारोपण झाले आहेत. अद्यापही प्रतीक्षायादी साडेतीन हजारांवर आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अवयवदान करायला हवे. यसाठी समाजात जनजागृती व्हायची गरज आहे.