पुणे : पुणे विभागातील धरणांमधील उपयुक्त जलसाठा ७७ अब्ज घनफूट (टीएमसी) असून गतवर्षीच्या १६९.९ टीएमसी (३१.१६ टक्के) च्या तुलनेत सुमारे ९०.९ टीएमसी इतकी तूट असल्याची माहिती पाणी नियोजनासंदर्भातील बैठकीत देण्यात आली. दरम्यान, धरणे, कालवे, नद्या तसेच अन्य जलस्रोतांमधील अनधिकृत आणि बेकायदा पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी दिले.

पर्जन्यमान विश्लेषण, धरणातील पाणीसाठ्याचा आणि पाणीवापराचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत गुरुवारी आढावा घेतला. त्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तुटीची माहिती देण्यात आली. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, उपजिल्हाधिकारी चारुशीला मोहिते, कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, अधीक्षक अभियंता किरण देशमुख यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण साखळी प्रकल्पाची जिवंत साठा क्षमता २९.१५ टीएमसी असून ४.१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, पवना धरणामध्ये १.६५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी ऑगस्टअखेरपर्यंत अंदाजित अनुक्रमे ४ आणि दीड टीएमसी पिण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार योग्य नियोजन करावे,’ अशी सूचना डुडी यांनी केली.

ते म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह अन्य पाणी वापरकर्त्या संस्थांनी उपलब्ध साठा आणि आगामी गरज लक्षात घेऊन पाणीवापराचे पुनर्नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी जलसाठा, पर्जन्यमान, आवक आणि पाणी वापराचा साप्ताहिक आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा.’

‘परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने जलाशय प्रचलन – संवर्धन (कंझर्वेशन रिझर्व्हायर ऑपरेशन) धोरण अवलंबून जलाशय संचालन करावे आणि आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध ४.१३ टीएमसी आणि पवना धरणातील १.६५ टीएमसी पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन करावे, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी,’ अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप आणि अन्य साधनांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याबाबत महसूल यंत्रणेला सूचना बैठकीत देण्यात आल्या. दरम्यान, पुणे विभागात आजचा उपयुक्त जलसाठा ७७ टीएमसी (१४.३०टक्के) असून गतवर्षीच्या १६९.९ टीएमसी (३१.१६ टक्के) च्या तुलनेत सुमारे ९०.९ टीएमसी इतकी तूट आहे, असल्याची माहिती प्रवीण कोल्हे यांनी दिली. एल-निनोच्या संभाव्य प्रभावाचा, पुणे विभागातील जलसाठ्याची सद्य:स्थिती, गत वर्षीच्या तुलनेतील लक्षणीय तूट, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा स्थिती, पर्जन्यमान विश्लेषण, संभाव्य धोके आणि आवश्यक उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.