पुणे : पावसाने दिलेली ओढ, तसेच अन्नधान्याच्या लागवडीत घट झाल्याने दिवाळीत फराळाचे जिन्नस महाग झाले आहे. साखर, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, तांदूळ, गहू, खाद्यतेले, तूप, सुकामेव्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फराळाचे जिन्नस महाग झाल्याने यंदाच्या दिवाळीत सामान्यांना महागाईची झळ पोहोचली आहे.
दुष्काळी परिस्थिती, अपेक्षित पाऊस न झाल्याने फराळासाठी लागणारे जिन्नस महाग झाले. गेल्या वर्षी दिवाळीत साखरेचे प्रतिकिलोमागे दर ४० ते ४२ रुपये होते. सध्या साखरेचे दर ५३ रुपये किलो आहेत. साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गूळ, बेसन, पोहे, हरभरा डाळ, फुटाणा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत गुळाचे प्रतिकिलोचे दर ५२ रुपये होते. सध्या गुळाच्या दरात प्रतिकिलोमागे साधारणपणे १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाचे दर ७२ रुपयांपर्यंत आहेत. बेसनाच्या दरात प्रतिकिलोमागे ३० रुपयांनी वाढ झाली आहे. बेसनाचा प्रतिकिलोचा दर ११० रुपयांवरुन १४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खोबऱ्याचे दर ४०० रुपयांपर्यंत आहे. पोहे, डाळींच्या दरात वाढ झाली आहे. चारोळीचे दर स्थिर आहे. खसखशीच्या दरात अत्यल्प वाढ झाली आहे.
फराळाचे जिन्नस प्रतिकिलोचे दर
जिन्नस………दिवाळी २०२५………दिवाळी २०२६
साखर………४२ रुपये………५३ रुपये
गूळ………५२ रुपये………७२ रुपये
रवा………३८ रुपये………४४ रुपये
मैदा………३८ रुपये………४४ रुपये
बेसन………११० रुपये………१४० रुपये
तूप………१५० रुपये………१९० रुपये
भाजके पोहे………७० रुपये………८५ रुपये
पातळ पोहे………६४ रुपये………७४ रुपये
मका पाेहे………६० रुपये………७५ रुपये
दगडी पोहे………६८ रुपये………८० रुपये
हरभरा डाळ………८० रुपये………१०८ रुपये
मुरमुरे………८८ रुपये………९६ रुपये
भाजकी डाळ………१२० रुपये………१४० रुपये
खोबरे………३६० रुपये………४२० रुपये
पाम तेल………१४० रुपये………१६० रुपये
सूर्यफूल तेल………१५० ते १५५ रुपये………१८० ते १८३ रुपये
यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने साखर, डाळी, कडधान्ये, तांदूळ, गहू, खाद्यतेल, सुकामेवा, तेल, तूप, सुकामेव्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. – राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीत लागणाऱ्या बहुतांश जिन्नसाच्या दरात वाढ झाली आहे. पोह्यांच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसाच्या दरात १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. – राजेश शहा, तांदूळ व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार
खाद्यतेलाचे दर साधारणपणे २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. दिवाळीत खाद्यतेलांना मागणी वाढली आहे. दिवाळीत दर टिकून राहण्याची शक्यता आहे. – रायकुमार नहार, खाद्येतल व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार
