पुणे : ‘दिवाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरेदीसाठी येणारे नागरिक, वाहतूक नियोजनासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीत महिलांकडील दागिने, रोकड चोरीला घटना घडतात. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
‘दिवाळीनिमित्त मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, महात्मा फुले मंडई, शनिपार परिसरात खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरेदीसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून नागरिक विशेषत: महिला मोठ्या संख्येने येतात. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून मध्य भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक शाखेतील पोलिसांना वाहतूक स्वयंसेवकांकडून सहाय्य केले जात आहे. गर्दीत गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
‘सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच दुकानासमोर बेकायदा पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये’, असे त्यांनी नमूद केले.
खरेदीच्या गर्दीत रोकड चोरी
दिवाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांच्या पिशवीतून रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. शनिपार आणि तुळशीबाग परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपार चौक परिसरात रविवारी (१ नाेव्हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेच्या पिशवीतून सात हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आली. या बाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी १४ हजार ७८८ रुपये लांबविले. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
