पुणे : दिवाळी काही दिवसांवर आली असून, शहरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. आकाशकंदील, उंबरपट्ट्या, शुभ-लाभाची चिन्हे, पणत्या, तोरणे, रांगोळ्या अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या सजावटीच्या साहित्यामध्ये सातत्याने बदल होत असून, दरवर्षी वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या वस्तू बाजारात दाखल होत आहेत. यंदा पारंपरिक सजावटीच्या साहित्याबरोबरच तयार रांगोळ्या, मोतिकाम, मीना कारागिरी असणारे सजावटीचे साहित्य आणि आकर्षक शुभ-लाभ चिन्हांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
शहरातील रविवार पेठ, रामसुख मार्केट, बोहरी आळी आणि तुळशीबाग या मध्यवर्ती बाजारपेठा विविध सजावटीच्या साहित्याने गजबजल्या आहेत. ग्राहकांकडून खरेदीसाठी गर्दी होत असून, शहरातील मॉलमध्येही दिवाळी सजावटीचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सवलती जाहीर करण्यात आल्याने ग्राहकांना खरेदीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
वेळेअभावी घराबाहेर रांगोळी काढणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी तयार रांगोळ्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवचीक कागदावर आकर्षक नक्षीकाम करून तयार केलेल्या या रांगोळ्या थेट घराबाहेर ठेवता येतात किंवा चिकटवता येतात. कमळ, दिवे अशा विविध आकारांतील रांगोळ्यांना मागणी आहे. याशिवाय, मोती, खडे, लेस आणि जरीकाम केलेली हळदी-कुंकवाची पावले, गाय-वासरूच्या प्रतिमा बाजारात उपलब्ध आहेत. या वस्तूंचे दर पाच ते दहा रुपयांपासून ते दोनशे तीनशे रुपयांपर्यंत आहेत. महागाईमुळे काही वस्तूंच्या किमतीत १५ ते १८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
आकाशकंदिलांचे दर साधारण १५० रुपयांपासून सुरू होऊन आकार आणि रचनेनुसार ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा किमतीत दोन ते चार टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, पारंपरिक आणि हस्तनिर्मित सजावटीच्या वस्तूंची मागणी कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोट
यंदा तयार रांगोळीला अधिक मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून सजावटीच्या साहित्यामध्ये नवनवीन कल दिसत आहेत. सजावटीचे साहित्य सर्वसामान्यांच्या आवाक्यात असून, लोकांमध्ये खरेदीचा उत्साह चांगला आहे.अशी माहिती विविक्रेता शेख मोहम्मद कैफ अहमद यांनी दिली.
आकाशकंदिलांच्या प्रकारांमध्ये यंदा कापडी, कागदी, लाकडी साहित्य पासून तयार केलेल्या कंदिलांना अधिक मागणी आहे. प्लास्टिकच्या कंदिलांकडे ग्राहक पाठ फिरवत असून, हस्तनिर्मित वस्तूंना पसंती दिली जात आहे. राजस्थानी कापड, मोर आणि हत्तींची नक्षी, ज्यूटचे साहित्य तसेच जिलेटिन आणि पेपरपासून तयार केलेल्या कंदिलांचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. मातीच्या पणत्यांनाही मागणी असून, चिनी बनावटीच्या पणत्या घेणे ग्राहक टाळत असल्याचे घाऊक विक्रेते ओंकार सूर्यवंशी यांनी सांगितले.
विविध रंगांच्या रांगोळ्यांना चांगली मागणी
तयार रांगोळ्यांचे छाप घेण्याकडे कल असला, तरी अजूनही रांगोळ्या घरी काढण्यासाठी तितकीच पसंती आहे. दररोज पंधराशे किलो रांगोळीची विक्री होत आहे. ही रांगोळी राजस्थानमधून येत असुन दरही स्थिर आहेत.असे रांगोळी घाऊक व्यापारी मोहम्मद घिवाला यांनी नमूद केले.
