रुग्णांच्या नातेवाईकांकडून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले आणि रुग्णालयांच्या तोडफोडीच्या घटना यांचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना गुलाबाचे फूल देऊन आणि मिठी मारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘जन आरोग्य अभियान’ व ‘पुणे सिटिझन्स डॉक्टर्स फोरम’ या संघटनांतर्फे या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ कार्यकर्त्यां विद्या बाळ, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, ‘फॉग्सी’ या स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय गुप्ते, ‘यंग फिजिशिअन्स असोसिएशन’चे डॉ. शिशिर जोशी, ‘निमा’ या संघटनेचे डॉ. सत्यजित पाटील, ‘जन आरोग्य मंच’चे डॉ. किशोर खिलारे, ‘जन आरोग्य अभियान’चे डॉ. अनंत फडके, डॉ. अभिजित मोरे, ‘पुणे सिटिझन्स डॉक्टर्स फोरम’चे डॉ. अरुण गद्रे या वेळी उपस्थित होते. डॉ. गुप्ते व डॉ. जोशी यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले. विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘डॉक्टर व समाज या दोहोंमध्ये काही वाईट प्रवृती असतात. पूर्वी कुटुंबाचा एक ठरलेला डॉक्टर असे.

कुटुंबातील सर्वाच्या आजाराचा इतिहास त्या डॉक्टरला माहीत असे. आता ती परिस्थिती बदलली. डॉक्टरने योग्य उपचार करूनही रुग्ण दगावण्याची शक्यता असते हे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्षात घ्यायला हवे.’’ ‘सरकारी रुग्णालयांमध्ये सोईसुविधा न मिळाल्यास डॉक्टर किंवा परिचारिकांवर राग काढला जातो. परंतु तसे न करता नागरिकांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारायला हवा. डॉक्टरांवरील हिंसेविरोधातील कायद्याची नीट अंमलबजावणी व्हायला हवी. परंतु केवळ कायद्याने प्रश्न सुटणार नसून डॉक्टर व रुग्णांमधील संबंध सुधारण्यासाठी विविध व्यासपीठे तयार व्हायला हवीत,’ असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune doctors association organises gandhigiri campaign against attacks
First published on: 12-06-2017 at 02:59 IST