पुणे : शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात असताना राज्याच्या ऑनलाईन यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘अधिवास प्रमाणपत्राच्या (डोमिसाईल दाखला ) ऑनलाईन प्रमाणपत्रात संबधित लाभार्थ्यांचे (विद्यार्थ्यांचे) नावच दिसत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे दिली जातात. डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष प्रतीमध्ये (हार्ड कॉपी) संबधित अर्जदार तसेच ज्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी हे प्रमाणपत्र हवे आहे, त्याचे नाव छापून येते.
या प्रमाणपत्राचा गैरवापर होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य सरकारने क्यू आर कोड टाकला आहे. या ‘क्यू आर कोड’ची ऑनलाईन पडताळणी केली असता त्यामधून चक्क विद्यार्थ्यांची नावे गायब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन पडताळणीमध्ये केवळ अर्जदाराचे नाव दिसत असल्याची राहुल निर्मल यांनी केली.
निर्मल यांनी पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी १२ जूनला डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यांना हवेली तहसीलदार कार्यालयाकडून प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देण्यात आली. त्यामध्ये त्यांचे अर्जदार म्हणून तर त्यांच्या पाल्याचे नाव होते. मात्र क्यू आर कोडची पडताळणी केली असता त्यामधून मुलाचे नाव गायब होत असल्याचे समोर आले. त्यांनी इतर अर्जदारांना मिळालेल्या प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी केली असता सर्वच प्रमाणपत्रातून विद्यार्थ्यांची नावे गायब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महा ई सेवा केंद्राकडे तक्रार केली असता आम्ही केवळ अर्ज घेतो, त्याबद्दल तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार करा, असा सल्ला देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. प्रवेश घेताना शाळा, महाविद्यालयाकडे हार्ड कॉपी दिली जाते. मात्र महाविद्यालयाने त्याची ऑनलाईन पडताळणी केल्यास त्यामधून लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव गायब होत असल्याने हे प्रमाणपत्र बनावट आहे, म्हणून शाळा, महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश रद्द केल्यास त्याची जबाबदारी कोणाची अशी विचारणा पालकांकडून केली जात आहे.
याबाबत बोलताना महा ई केंद्राचे जिल्हा समन्वयक सुशील खोत म्हणाले, गेल्या काही आठवड्यांपूर्वी सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेल्या ‘अपग्रेड’नंतर हा तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. त्याची माहिती संबधित यंत्रणांना देण्यात आली आहे.
हवेली तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत हवेलीच्या तहसीलदार अर्चना निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहित सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अशी विनंती केली आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणालीमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्यात याव्यात. आयटी विभाग आणि महा ई-सेवा केंद्राच्या तज्ज्ञांना याबाबत सूचना देऊन हा तांत्रिक बिघाड त्वरीत दुरुस्त करावा, अशी मागणी निकम यांनी केली आहे.
