भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त समाजाच्या विविध स्तरांतून अनेक विधायक कामे हाती घेण्यात आली. राज्यभरातील रक्तपेढ्यांकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान यज्ञ पार पडला. १५, १६ आणि १७ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये राज्यभरात सुमारे ४८४ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये २७,३५१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत याबाबत माहिती देण्यात आली. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या नियमित रक्तदान शिबिरांचा वेग कमी झाला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ तर्फे ९ ऑगस्टला प्रकाशित करण्यात आले होते. मात्र, १५, १६ आणि १७ ऑगस्ट या तीन दिवसात राज्यभर रक्तदानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. थोरात म्हणाले, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचा उत्साह दिसुन आला. १५, १६ आणि १७ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये सुमारे ४८४ रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध रक्तपेढ्यांकडून करण्यात आले. या तीन दिवसात २७,३५१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले असून हे रक्तसंकलन सुमारे २५ दिवसांसाठी पुरेसे ठरणार असल्याचे डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले.

रक्तदान ही नियमित, निरंतर प्रक्रिया व्हावी
राज्यातील रक्तपेढ्यांचे विभागीय समन्वयक डॉ. शंकर मुगावे म्हणाले, यंदा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी रक्तदान करण्यासाठी अनेक रक्तदाते पुढे आले. त्यांचे स्वागत करतो. या सर्व रक्तदात्यांनी यापुढे नियमित रक्तदाता व्हावे, असे आवाहन मी त्यांना करु इच्छितो. रक्तदान करणे ही प्रक्रिया निरंतर सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, संकलन आणि प्रक्रिया करण्याची धावपळ, त्याचा पायाभूत सुविधांवर येणारा ताण तसेच वेळ, ऊर्जा, अर्थकारण यांवर येणारा ताण टाळणे शक्य होईल, असेही डॉ. मुगावे यांनी स्पष्ट केले.