Pune Dowry Death Case IT Engineer Trishna: पुणे जिल्ह्यात आणखी एक हुंडाबळी प्रकरण घडले आहे. पती आणि सासरच्या छळाला कंटाळून एका ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर पत्नीने स्वतःचे आयुष्य संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने संपूर्ण पगार पतीला द्यावा आणि माहेरचे घरे नावावरून करून द्यावे, यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप पत्नीच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत महिलेने पतीसह सासरच्या चार लोकांना यासाठी जबाबदार धरले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, मृत महिलेचे नाव तृष्णा असे आहे. २९ सप्टेंबर रोजी पुण्यातील केशव नगर येथे राहत्या घरात त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यानंतर त्यांचे वडील बाळकृष्ण निकम यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनंतर तृष्णा यांचे पती राहुल आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकम यांच्या तक्रारीनुसार, तृष्णा आणि राहुल यांचे २०१८ साली लग्न झाले होते. तृष्णा यांच्या पालकांनी लग्नात १३ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. तृष्णा या आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांचे संपूर्ण वेतन नवऱ्याला देण्यात यावे, तसेच माहेरचे घरही सासरच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

तृष्णा यांच्या सासऱ्यांनी स्वतःच्या नावावर एक कोटी रुपयांचा फ्लॅट घेऊन द्यावा, अशी मागणी केली होती, असेही पोलिसांनी म्हटले. सासरी सतत होणारी भांडणे आणि छळाला कंटाळून २०२१ पासून हे जोडपे केशव नगर येथे वेगळे राहत होते. मात्र तरीही तृष्णा यांचा छळ सुरूच राहिला. पतीने मारहाण करून तृष्णा यांना घराबाहेर काढले होते, त्यामुळे त्या माहेरी येऊन राहत होत्या. तसेच पती राहुलने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तृष्णा यांनी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यानुसार पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

पुण्यात हुंडाबळीची अनेक प्रकरणे

पुण्यात मागच्या दोन वर्षात अनेक हुंडाबळीची प्रकरणे घडली आहेत. यापैकी वैष्णवी हगवणे या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. त्यानंतरही स्वाती पाठक, वैष्णवी जरांडे अशा इतर विवाहितांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या.

२९ सप्टेंबर २०२६ ला पुण्यात आयटी इंजिनिअर वैष्णवी जरांडे यांनीही सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. लग्नात भरमसाठ खर्च करूनही सासरचे लोक छळ करत असल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच त्यांनी आत्महत्या केली.

जून २०२५ मध्ये स्वाती पाठक यांनी पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी पती सूरज पाठक आणि सासरच्या इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

मुळशी तालुक्यात मे २०२५ मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संबंध महाराष्ट्राला धक्का बसला होता. सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली होती. यानंतर पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा आणि कुटुंबातील इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई झाली होती.