पुणे : हुंड्यासाठी महिलेचा छळ करून एका भोंदूकडे नेऊन अघोरी कृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विवाह ठरल्यानंतर आरोपींनी १५ लाख रुपये हुंडा मागितला होता. फिर्यादी महिलेच्या वडिलांनी विवाह ठरल्यानंतर आरोपींना दोन लाख २० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले होते. विवाह झाल्यानंतर हुंड्यातील रक्कम न दिल्याने महिलेचा छळ सुरू केला. ‘पतीला मंगळ ग्रहाची बाधा असून, बाधा दूर करण्यासाठी एकाकडे जावे लागेल,’ असे आरोपींनी सांगितले. महिलेला संबंधित भोंदूकडे नेल्यानंतर तिला अघोरी कृत्य करण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करून मारहाण केली गेली.

महिलेच्या पतीचा मंगळ दोष दूर झाल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादी महिलेला नांदविण्यास नकार दिला. शारीरिक आणि मानसिक छळ, तसेच अघोरी कृत्य केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल जगताप तपास करत आहेत.