‘३०० मिसिंग’चे कलावंत ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीसाठी सज्ज

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागातून महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या स. प. महाविद्यालयात सध्या महाअंतिम फेरीचे वारे सुरू आहे. ‘३०० मिसिंग’ या एकांकिकेतील कलाकार पुण्यातील रंगमंचावर सादरीकरण केल्यानंतर आता मुंबईतील प्रेक्षकांना जिंकून घेण्यासाठी सज्ज आहेत. महाविद्यालयाच्या संघातील बहुतेक सर्वच कलाकारांना ‘ऑनस्टेज’ आणि ‘बॅकस्टेज’ अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागत असल्यामुळे काटेकोर नियोजन करून अंतिम फेरीतील सादरीकरणाची तयारी सुरू आहे. संघाबरोबर बघायला कोण येणार, जायचे कसे, नेपथ्य कसे न्यायचे याचे नियोजन करण्यात येत आहे. चित्रपटांच्या स्पेशल इफेक्ट्सच्या निर्मात्याची गोष्ट ‘३०० मिसिंग’मध्ये पाहता येणार आहे.

नाटकाची तालीम पाहून शेवटचा हात फिरवण्यासाठी, कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी, लागेल तशी मदत करण्यासाठी कला मंडळातील आजी, माजी सदस्य महाविद्यालयांत हजर आहेत.

सेट नेणाऱ्या वाहनाबरोबर कुणी जायचे, बाकीच्यांनी कसे जायचे, बरोबर कोण येणार याचे नियोजन सुरू आहे. सादरीकरणाच्या आधी पडद्याआड सुरू असलेल्या लगबगीला घोषणांची साथ देण्यासाठी ‘चिअरिंग’ टीम जशी सर्वत्र असते तशी ती इथेही आहे. परंतु, मुंबईत फेरीसाठी सगळ्यांनाच येता येणार नसल्याने सध्या ही टीम थोडी खट्टू आहे. त्यामुळे या ‘टीम’ची गैरहजेरी महाअंतिम फेरीलाही निश्चितपणे जाणवेल. तालमींना पूर्णविराम देऊन संघाची नैपथ्य, वेशभूषा याची आवराआवर सुरू आहे. वातावरण खेळीमेळीच राहावे, कलाकारांवर तणाव येऊ नये यासाठी दिग्दर्शक आणि वरिष्ठ मंडळी प्रयत्न करत आहेत.

महाअंतिम फेरीबाबत उत्सुकता आहेच. आम्ही पुण्यात प्रयोग केले आहेत. मात्र मुंबईत पहिल्यांदाच प्रयोग करणार आहोत. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सर्वोत्तम एकांकिकांशी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता अधिक मोठे आव्हान आहे. पुण्यात प्राथमिक आणि अंतिम फेरीतील परीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही काही बदल केले आहेत. ते बदल अंगवळणी पडण्यासाठी विशेष लक्ष देत आहोत. मात्र आता दिवस-रात्र तालमी बंद करून ठरावीक नियोजन करून तालीम करत आहोत. महाअंतिम फेरीतील प्रयोगासाठी आमची पूर्ण ऊर्जा देऊन, शंभर टक्के देऊन आम्ही प्रयोग सादर करू.

– यश रुईकर, दिग्दर्शक, सहलेखक