पुणे : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स) पुण्यात केलेल्या एका कारवाईत महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेले शेकरू आणि दुर्मीळ भारतीय नक्षत्र कासवांच्या (इंडियन स्टार टॉरटाॅइज) तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तस्करांकडून तीन शेकरू आणि सात कासवे ताब्यात घेण्यात आली.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) मिळाली होती. पुण्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून रेल्वे स्थानक परिसरातील एका निश्चित केलेल्या ठिकाणी पाळत ठेवली. त्या वेळी पहिल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता, दोन पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये तीन जिवंत शेकरू लपवून ठेवल्याचे दिसले. अधिक चौकशी केल्यावर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शोध पथकाने पुण्यातच दुसऱ्या एका ठिकाणी तातडीने धाड टाकली. तेथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याकडून सात जिवंत कासवे जप्त करण्यात आली.
ताब्यात घेतलेले दोन्ही प्राण्यांचा केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित श्रेणी (शेड्यूल वन) श्रेणीत समावेश होतो. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून त्याचा व्यापार आणि शिकारींवर कायद्याने पूर्ण बंदी आहे. स्टार कासवाला कायद्याने विशेष संरक्षण दिले असून ते बाळगणे, वाहतूक करणे किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरी देखील आरोपीने या दोन्ही प्राण्यांना विक्रीसाठी पुण्यात आणले होते. त्यामुळे शोध पथकाने वन्यजीव, दोन्ही आरोपी आणि तस्करीसाठी वापरलेले साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे वन विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
आरोपी आमच्या ताब्यात असून दोघांवर वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. दोघांना तीन दिवसांची वन कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे. विशाल चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वन विभाग
