scorecardresearch

पुणे : ‘सर्पदंशावर उपचारासाठी केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू’

सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात, सध्या सर्पदंश या विषयावर जागरूकता वाढली आहे.

पुणे : ‘सर्पदंशावर उपचारासाठी केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू’
( पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामान्य ते असामान्य ' या कार्यक्रमात डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत या दांपत्याशी डॉ. लिना बोरुडे आणि ॲड. चेतन गांधी यांनी संवाद साधला )

सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात, सध्या सर्पदंश या विषयावर जागरूकता वाढली आहे. आगामी काळात सर्पदंश पीडितांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावे, यासाठी सर्पदंश उपचाराला वाहिलेले केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले.

पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामान्य ते असामान्य ‘ या कार्यक्रमात डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत या दांपत्याशी डॉ. लिना बोरुडे आणि ॲड. चेतन गांधी यांनी संवाद साधला. त्यावेळी राऊत बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, उद्योजक सतीश कोंढाळकर, निवेदिता कोंढाळकर या वेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. आतापर्यंत साडेपाच हजारांहून अधिक सर्पदंश पीडितांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचविणारे डाॅ. राऊत यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. राऊत म्हणाले, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेकडून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्यात आला असून, त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या लशींबाबत राष्ट्रीय मापदंड ठरविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक प्राथमिक उपचार केंद्रात २० लशी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र, प्रत्यक्षात मात्र केवळ पाच लशी उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या समस्येवर प्रशिक्षणाद्वारे मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्पदंशावरील उपचाराचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून, सीरम इन्स्टिट्यूटतर्फे सर्पदंशावरील कमी किमतीची मात्र प्रभावी लस निर्माण करण्याचे काम सुरू आहे.- डॅा. सदानंद राऊत

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या