पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली. त्या पार्श्वभूमीवर, राजकीय फलकांवर कारवाई करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिला. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरभर राजकीय नेत्यांचे फलक लागले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने आचारसंहितेची अंमलबजावणी करायची कशी, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.
विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बैठक घेऊन आचारसंहिता पालनाचा आदेश दिला. मात्र, सध्या गणेश मंडळांच्या माध्यमातून शहरभर राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार आणि विविध राजकीय नेत्यांच्या नावांचे फलक लावलेले आहेत. ते काढावे लागणार आहेत. बहुतांश गणेश मंडळांचे पदाधिकारी राजकीय नेते आहेत. गणेशोत्सवाच्या काळात आचारसंहिता पालनाचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
पुणे महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात पाच बिगारी, एक आकाशचिन्ह निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने काम करून घेतले जाणार आहे. राजकीय जाहिरात फलक काढण्याची जबाबदारी प्रत्येक क्षत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांवर देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.
आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनावर असली, तरी शहरातील प्रत्येक रस्ता, चौक आणि प्रमुख गणेश मंडळ परिसरात लावण्यात आलेले फलक शोधून त्यांवर कारवाई करणे महापालिकेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे. त्यातच विविध नागरी कामे, अतिक्रमण कारवाई आणि अन्य प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळण्याबरोबरच आता ठिकठिकाणी लावलेले फलक काढण्याचे काम आले आहे.
त्यामुळे हे फलक काढणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर म्हणाले, ‘आचारसंहिता लागू झाल्याने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचा आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिला आहे. त्यानुसार आकाशचिन्ह आणि परवाना विभागातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरभर लावण्यात आलेले जाहिरात फलक काढून टाकले जातील. महापालिकेच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन हे फलक काढण्यात येतील.’
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची अंमलबजावणी केली जात आहे. सुरुवातीला सरकारी कार्यालयांतील फलक झाकण्यात आले आहेत. त्यानंतर सार्वजनिक भागातील फलक आणि प्रकल्पांवरील नावे झाकली जातील. त्यानंतर खासगी जाहिरात फलक, बॅनर, तसेच खासगी जागांवरील फलकांवर कारवाई करून ते काढून टाकण्याचा आदेश संबंधित विभागांना देण्यात आला आहे, असेही महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त काटकर यांनी स्पष्ट केले.
