पुणे : वाढत्या पुण्यातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नवीन महामार्गांची उभारणी करण्यात येणार असून, उन्नत महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर-यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्गाचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून आरेखन-बांधकाम-वित्त-संचलन आणि हस्तांतर या सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे १८ हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठी चार वर्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, प्रत्येक रस्त्यावर प्रतिकिलोमीटर ९ रुपयांप्रमाणे २५ वर्षांसाठी पथकर आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, या तिन्ही उन्नत महामार्गांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज, शनिवारी (१८ जुलै) पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातील माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता अनिल सगर यावेळी उपस्थित होते.

पुणे शिरूर हा सहापदरी उन्नत द्रुतगती महामार्ग एकूण ५३.४० किलोमीटरचा असेल. त्याची सुरुवात वाघोलीपासून होणार असून, कोंढापुरीपर्यंत हा महामार्ग सहा पदरी उन्नत असेल. त्यानंतर सहा किलोमीटर सहा पदरी जमिनीवर, त्यानंतर पुन्हा २ किलोमीटरचा उन्नत सहा पदरी आणि त्यानंतर अडीच किलोमीटरचा जमिनीवरील सहा पदरी रस्ता असेल. त्यानंतर पुढे २ किलोमीटरचा उन्नत महामार्ग असेल. शिरूर बाह्यवळणाजवळ हा महामार्ग संपणार आहे. या रस्त्यासाठी ४५ ते ५० हेक्टर भूसंपादन करण्यात येणार असून, एकूण खर्च ७ हजार ५१५ कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे उन्नत महामार्गावर ६, तर जमिनीवरील रस्त्यावर २ असे एकूण ८ पथकर केंद्रे असतील. त्यात खराडी बायपास ते विठ्ठलवाडी या ७.४० किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गिका असेल, असे सांगण्यात आले.

हडपसर ते यवत हा महामार्ग ३१.५० किलोमीटरचा असून, २५ किलोमीटर सहा पदरी उन्नत तर साडेसहा किलोमीटर जमिनीवरून सहापदरी रस्ता असेल. या रस्त्याची सुरुवात हडपसर गाडीतळापुढील रवीदर्शन चौकापासून सुरू होणार असून, यवत सहजपूरपर्यंत उन्नत, तर त्यानंतर यवतपर्यंत जमिनीवरील सहापदरी मार्ग असेल. रवीदर्शन ते कोरेगाव मूळजवळील बाह्य रिंगरोडपर्यंत १७.७६ किलोमीटरची मेट्रोसाठी मार्गिका असेल. या महामार्गासाठी ५ हजार २६२ कोटींचा खर्च येणार असून, १५ किलोमीटरचे भूसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्यासाठी उन्नत मार्गिकेवर ३ आणि जमिनीवरील रस्त्यावर २ अशी एकूण ५ पथकर केंद्रे असतील.

तळेगाव चाकण शिक्रापूर या ५३.२० किलोमीटर रस्त्यासाठी चाकणपर्यंत २६.३० किलोमीटरचा चार पदरी उन्नत मार्ग तर शिक्रापूरपर्यंतचा २७ किलोमीटरचा मार्ग जमिनीवरील चार पदरी असेल. यासाठी ५ हजार २०० कोटींचा खर्च येणार असून, सुधावाडीजवळ बाह्य रिंगरोडशी, तर शिक्रापूरजवळ पुणे शिरूर सहा पदरी उन्नत महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी ४० हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार असून, उन्नतसाठी ३ तर जमिनीवरील रस्त्यासाठी २ अशी ५ पथकर केंद्रे असणार आहेत.