देशातील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र म्हणून पुण्याची ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांत जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जीसीसी) राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या पुण्याला पसंती देत आहेत. यामुळे पुण्यातील ‘जीसीसी’ची परिसंस्था वेगाने विकसित होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून पुण्यातील ‘जीसीसीं’ची संख्या आता पाचशेहून अधिक झाली आहे. पुणे महानगराची लोकसंख्या सुमारे ८१ लाख असून, त्यातील सक्रिय लोकसंख्या २३ लाख आहे. पुण्यातील आयटी व संलग्न सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख ५० हजार आहे. याच वेळी ‘जीसीसी’मध्ये कार्यरत मनुष्यबळाचा आकडा आता २ लाख १० हजारांवर पोहोचल्याचे ‘केपीएमजी’ संस्थेच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. यातून ‘जीसीसी’चा वाढता विस्तार लक्षात येण्यासोबत महानगराचा बदलणारा औद्योगिक चेहरामोहराही समोर आला आहे.

देशातील एकूण ‘जीसीसी’मध्ये पुण्याचा वाटा १४ टक्के झाला आहे. याच वेळी देशातील एकूण ‘जीसीसी’ मनुष्यबळात पुण्याचा वाटा ९ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुण्यातील ‘जीसीसी’ विस्तार वेगाने सुरू असून, २०३० पर्यंत ‘जीसीसीं’ची संख्या ६६० ते ६८० वर जाण्याचा अंदाज आहे. पुण्यातील ‘जीसीसी’ परिसंस्थेचा विचार करता तीसहून अधिक देशांतील कंपन्यांनी पुण्याची निवड केली आहे. त्यात अमेरिकेतील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक असून, तो ५५ टक्के आहे. त्याखालोखाल जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, जपान, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड या देशांतील कंपन्यांचा वाटा आहे. पुण्यातील एकूण ‘जीसीसी’मध्ये युरोपमधील कंपन्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक आहे. पुण्यात प्रामुख्याने तंत्रज्ञान, वाहन निर्मिती, उत्पादन, आरोग्यसुविधा औषधनिर्माण आणि बँकिग व वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘जीसीसी’ असल्याचे हा अहवाल अधोरेखित करतो.

पुण्याकडे जगभरातील कंपन्यांचा कल असण्यामागे प्रमुख कारण हे कुशल मनुष्यबळ आहे. पुण्यात तीसहून अधिक विद्यापीठे, तर ४७० महाविद्यालये आहेत. यामुळे त्यातून बाहेर पडणारा मोठा तरुण वर्ग या कंपन्यांसाठी उपलब्ध होत आहेत. पुण्यात वर्षाला सुमारे २ लाख तरुण पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विद्याशाखांतील पदवीधरांची संख्या सुमारे ९० हजार आहे. या कुशल मनुष्यबळामुळेच पुण्यात कार्यरत असणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांची संख्या २ हजारांहून अधिक झाली आहे, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींची संख्या आठशेहून अधिक आहे.

पुण्यातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास सुरू असून, त्याचाही सकारात्मक परिणाम गुंतवणूक आकर्षित होण्यात होत आहे. मुंबईशी असलेली नजीकता आणि पुणे महानगरात मेट्रोचे विस्तारणारे जाळे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या परिसरात ‘जीसीसीं’ची संख्या जास्त आहे. याचबरोबर वाकड, बाणेर आणि येरवडा, विमाननगर भागांत ही संख्या वाढू लागली आहे. पुणे महानगरात गेल्या तीन वर्षांत १३० नवीन ‘जीसीसी’ सुरू झाले असून, कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाधारित ‘जीसीसीं’चे प्रमाण ४० टक्के आहे. त्यातील २५ टक्क्यांहून अधिक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील, तर २२ टक्के बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील आहेत.

पुण्यातील महत्त्वाचे औद्योगिक टप्पे

  • ‘टाटा मोटर्स’चा उत्पादन प्रकल्प – १९६६
  • ‘सिटीकॉर्प’चे पहिले ‘जीसीसी’ – १९८५
  • राजीव गांधी आयटी पार्क – १९९०
  • फोक्सवॅगन, मर्सिडिज बेंझचे उत्पादन प्रकल्प – २००९

sanjay.jadhav@expressindia.com