पुणे : देशभरात ऊर्जा साठवणूक क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होत असून, उद्योग-व्यवसायिकांसह घरगुती वीज ग्राहकांना वीज विकून नफा मिळवता येत असल्याचे निरीक्षण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या वतीने आयोजित कार्यशाळेत नोंदविण्यात आले.इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या वतीने ‘द एनर्जी स्टोरेज सिस्टीम’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्य वीज नियामक आयोगाचे माजी सदस्य जयंत देव आणि नेट झीरो एनर्जी ट्रान्झीशन असोसिएशनच्या उपाध्यक्षा नेत्रा वालावलकर यांनी मार्गदर्शन केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे दत्तात्रय बोरमाने, हर्षवर्धन देवकाते आदी या वेळी उपस्थित होते.

जयंत देव म्हणाले,‘ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. आता सौरऊर्जेची निर्मितीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी साठवणूक यंत्रणेची गरज असते. आता स्टोरेज तंत्रज्ञानाद्वारे सर्वच वीज ग्राहकांना विशेषतः हॉटेल्स आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांना पैशांची बचत करता येईल. छतावर सोलर पॅनेल्स बसवून किंवा स्वतःच्या जागेत सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या सगळ्यांनाच स्टोरेज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खर्च कमी करणे शक्य आहे. अनेक उद्यागांना इंडियन एनर्जी एक्स्चेंजकडून दिवसा दोन रुपयांपेक्षा कमी दराने स्वस्त वीज घेता येते. ही वीज साठवून बाजारात विजेची मागणी जास्त असेल, तेव्हा ती विकून नफाही कमावता येऊ शकतो.’

‘कोकणात मुसळधार पाऊस पडतो, जांभी माती आढळते. तिथे वीस फुटांपर्यंत खोदकाम करून सोडलेल्या अनेक खाणी आता बंद आहेत. या खाणींचे रूपांतर पंप हायड्रो सिस्टीममध्ये करता येऊ शकते. ऊर्जा साठवणुकीसाठी फक्त बॅटऱ्यांवर किंवा इतर काही गोष्टींवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर केला जाऊ शकतो,’ असेही जयंत देव यांनी सांगितले.

‘ऊर्जा साठवण क्षेत्रात धोरणनिर्मिती आणि प्रायोगिक प्रकल्पांच्या टप्प्यातून अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वाटा लक्षात घेता विजेच्या मागणीचे व्यवस्थापन, ग्रीड संतुलन, नवीकरणीय ऊर्जेचे स्थिरीकरण, सहायक सेवा, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना विश्वासार्ह वीजपुरवठा निश्चित करण्यासाठी स्टोरेज तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी धोरणांमध्ये स्पष्टता येणे अधिक गरजेचे आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुंतवणूकक्षम ऊर्जा साठवण परिसंस्था निर्माण करून ग्रीड, वीज वितरण कंपन्या, उद्योग आणि ग्राहकांसाठी मोजता येण्याजोगे मूल्य निर्माण करण्याची महाराष्ट्राला मोठी संधी आहे,’ असे नेत्रा वालावलकर यांनी सांगितले.