पुणे : ‘विकासाच्या नावाखाली शहरात वाढत चाललेली सिमेंट काँक्रिटची जंगले, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता बिनदिक्कतणे नदीत सोडले जाणारे सांडपाणी, ओला आणि सुका कचऱ्याचे न होणारे वर्गीकरण आणि वर्षानुवर्षे दिली जाणारी आश्वासने यामुळे शहरातील पर्यावरणाची स्थिती बिघडत असून, प्रशासनाने वेळीच सावध व्हावे, अन्यथा वेळ निघून गेलेली असेल,’ अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी बिघडलेल्या पर्यावरणाच्या स्थितीबाबत महापालिका प्रशासनाला सुनावले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पर्यावरणाच्या सद्य:स्थितीच्या अहवालावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवल. हवा, ध्वनी प्रदूषणात होणारी वाढ, टेकड्यांवरील वाढते बांधकाम, ओढे-नाल्यांमध्ये टाकला जाणारा राडारोडा, नदी प्रदूषण, वृक्षतोड अशा विविध प्रश्नांवर सभासदांनी प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाने तयार केलेला पर्यावरण अहवाल चकचकीत असला, तरी प्रत्यक्षात पुण्याची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे वास्तव नगरसेवकांनी मांडले. केवळ विकसित पुणे नव्हे, तर राहण्यालायक पुणे तयार करणे अधिक गरजेचे आहे, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांमध्ये बांधकाम खात्याने ९८ कोटी चौरस फूट बांधकामाची परवानगी दिली आहे. मात्र, हे करताना नागरिकांना पुरेसे पाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी नियोजन शून्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

शांत पुणे, टेकड्यांचे शहर अशी असलेली पुणे शहराची ओळख विकासाच्या नावाखाली पुसली जात असल्याचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले. शहरातील ओढे, नाले, बुजवून त्यावर सिमेंट काँक्रिटची जंगले उभी केल्याचा आरोप संगीता दांगट यांनी केला. प्रशासनाने वेळीच सावध न झाल्यास याचे मोठे परिणाम भविष्यात भोगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रात्री-अपरात्री डंपरची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे, नगसेविका अनिता इंगळे यांनी सांगितले. नांदोशी परिसरातील खाणींमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा प्रश्न त्यांनी मांडला. डंपर वाहतुकीवर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

नगरसेवक अजित घुले यांनी समाविष्ट गावांमधील ओढे-नाल्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून राडारोडा टाकला जात असल्याचा आरोप केला. नगरसेविका दीपाली डोख यांनी पर्यावरण अहवालावर टीका करताना तो ‘अतिशय चकचकीत आणि गुळगुळीत’ बनवण्यात आल्याचे म्हटले. ‘प्रत्यक्षात पुणे शहरातील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरिकांना श्वास घेता येईल, असे पुणे हवे आहे. केवळ विकसित पुणे नव्हे, तर राहण्यालायक पुणे असणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘रस्त्याचे काम करताना ठेकेदार झाडांभोवती सिमेंट काँक्रिट तसेच डांबर टाकतात, यामुळे झाडे मरतात. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च होतो, मात्र प्रत्यक्षात नदी अस्वच्छ असते,’ अशी टीका पुनीत जोशी यांनी केली. नगरसेवक बापू मानकर यांनी सण-उत्सवांमधील ‘डीजे’च्या आवाजाचा मुद्दा उपस्थित करून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ‘डीजे’वर बंधने आणि मर्यादा घालण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले.