पुणे : ‘समान पाणीपुरवठा योजनेचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून, ६० झोनमध्ये पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन आणि पाण्याचे मीटर बसवून पूर्ण झाले आहे. याची देखभाल दुरुस्तीची कामे ‘एल अँड टी’ कंपनीकडे दिले जाणार आहे. त्यामुळे पाणीवापराचे मोजमाप करून पुढील महिनाभरात शहरातील काही झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मीटर रीडिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच, डमी बिले तयार करण्यास सुरुवात केली जाईल,’ अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व भागांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मंजूर करून आठ वर्षे झाल्यानंतरही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या या योजनेचे काम ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या योजनेसाठी महापालिकेने पाण्याच्या दरात वाढ केली असून, मीटरद्वारे पाण्याचा वापर निश्चित करून गळती कमी करण्याचे नियोजन आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ८३ पाण्याच्या टाक्या आणि सुमारे एक हजार किलोमीटर नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तसेच, पाणीवापर मोजणारी सुमारे पावणेतीन लाख मीटरदेखील बसविण्यात येणार आहेत. यापैकी केवळ ४० हजार मीटर बसविणे शिल्लक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आवश्यक ते नियोजन केले आहे. पुढील काही दिवसातच शहरातील सर्व नागरिकांना मीटरने पाणी देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
‘समान पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या १४४ झोनपैकी ६० झोनमधील पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन आणि मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल करण्याचे काम ‘एल अँड टी’ कंपनीला दिले जाणार आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून, महिनाभरात ज्या झोनमध्ये सर्व कामे पूर्ण झाली आहेत, तेथे नागरिकांना मीटरची डमी बिले देण्यास सुरुवात केली जाणार आहे,’ असे कौर यांनी सांगितले.
कौर म्हणाल्या, ‘८३ पैकी ६३ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १० सप्टेंबरपर्यंत आणखी १६ टाक्या कार्यान्वित होतील. काही ठिकाणी पाइपलाइनच्या कामासाठी जागा मिळविण्यात अडचणी येत आहेत, ते सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर मीटरलाही काही ठिकाणी विरोध होत असल्याने विलंब होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही
शहराचा वाढत असलेला विस्तार आणि पाणी गरज भागविण्यासाठी उपलब्ध पाण्याची योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. यासाठी महापालिका मीटरने पाणी देणार असून ही योजना तातडीने कार्यान्वित करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला यापूर्वीच दिलेले आहेत. महापालिकेबरोबर घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
