‘ईव्हीएम’मुळे लोकशाहीचा खून झाला असून, निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने दबावाखाली काम केले, असा संताप पराभूत उमेदवारांनी आज, सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा (२०१२ ते २०१७) कार्यकाळ संपुष्टात आला असून, आज त्यांना सर्वसाधारण सभेत निरोप देण्यात आला. त्यात अनेक नगरसेवकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर आपला पराभव का आणि कशामुळे झाला, यावर तब्बल चार तास चर्चा केली.
सर्वसाधारण सभेला बहुतांश मावळत्या नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगरसेवकही उपस्थित होते. पराभूत नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेविका रुपाली पाटील, मीनल सरवदे, नंदा लोणकर, पुष्पा कनोजिया, वसंत मोरे, दीपक मानकर, बाबू वागस्कर, अविनाश बागवे, स्मिता वसते, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, अशोक येनपुरे, मनसे गटनेते वसंत मोरे, अभय छाजेड, संजय बालगुडे आदींची भाषणे झाली. यात आपला पराभव कशामुळे झाला, यावरच पराभूत उमेदवारांनी चर्चा केली. मागील पाच वर्षांत प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून, या निवडणुकीत पराभव होईल, असे वाटले नव्हते. विकासकामे हरली आणि धनशक्ती जिंकली, असे मनसेच्या पराभूत नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी सांगितले.




मागील दोन महापालिका निवडणुकांमध्ये जनतेने भरघोस मतांनी विजयी केले. मात्र यंदा प्रभागरचना करण्यात आली. तरीही निवडणुकीला सामोरे गेलो आणि विजयी झालो. माझा पराभव करण्यासाठी विरोधकांनी सर्व ताकद पणाला लावली. मात्र मी विकासकामाच्या जोरावर निवडून आलो, असे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले. मला घरातील एका हट्टी व्यक्तीमुळे निवडणूक लढवता आली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश म्हस्के म्हणाले. या निवडणुकीत अधिकारी वर्गापासून उद्योजकापर्यंत मला पाडण्याचा प्रयत्न केला. पण न डगमगता निवडणूक जिंकली, नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले. ज्या प्रकारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधानांची लाट होती. ती मान्य करतो; मात्र यंदाच्या महापालिकेत त्यांची लाट नव्हती, तर मशीनची लाट होती, असे पराभूत उमेदवार किशोर शिंदे यांनी सांगितले.
भाजपने महापालिका निवडणुकीत गुंडाना उमेदवारी दिली. पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. पुन्हा निवडणूक झाल्यास भाजपने किमान ६० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान दीपक मानकर यांनी दिले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे यशस्वी ठरलो असे सांगत हा कार्यकाळ ट्वेंटी – २० सामन्याप्रमाणे खेळलो असून अनेक आव्हाने होती. मात्र न डगमगता सामोरे गेलो, अशी भावना महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. नगरसेवक म्हणून जरी पराभूत झालो असलो तरी, पुढील सुवर्णकाळ असणार आहे, असेही ते म्हणाले.
आमचा आमदार हुशार: शंकर केमसे
महापालिका निवडणुकीत आमचा आमदार हुशार निघाला. त्यांच्या पत्नीला भाजपचे तिकीट मिळाले आणि त्या निवडूनही आल्या. हे लक्षात घेता पक्षाने यापूर्वी दोन वेळा आमदार, सभागृह नेता इतके सर्व ‘दादां’नी दिले असताना, त्यांनी असे का केले, असा सवाल सभागृह नेते शंकर केमसे यांनी केला. त्यांना उपकाराची जाण नाही, अशी टीकाही त्यांनी अनिल भोसले यांचे नाव न घेता केली. निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, या पुढील काळात पक्ष वाढवण्यावर भर देणार असून, शाहू, फुले आणि आंबडेकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे, असा निर्धारही त्यांनी केला.