पुणे : सौंदर्य प्रसाधनाच्या खोक्यांतून गोव्यातील मद्याची तस्करीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे पथकाने उघडकीस आणला. पुणे - सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर भागात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून एक कोटी २८ लाख रुपयांचा मद्यसाठा, तसेच ट्रक असा एक कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुनील चक्रवर्ती याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील मद्य स्वस्त आहे. गोव्यात मद्यावर कर कमी असल्याने अन्य राज्यांच्या तुलनेत तेथे स्वस्त दरात मद्य उपलब्ध होते. गोव्यातून पुणे शहर, परिसरात मद्याची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाला मिळाली होती. बेकायदा मद्य विक्री प्रकरणात शहरातील पब, तसेच बारविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. बेकायदा मद्य विक्री, तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. हेही वाचा.आयएएस’ अधिकारी की नववतनदारी? पुणे - सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर भागात गोव्यातील मद्याची तस्करी एका ट्रकमधून होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने सापळा लावला. संशयित ट्रक अडवण्यात आला. ट्रकची तपासणी करण्यात आली आहे. तेव्हा ट्रकमध्ये सौंदर्य प्रसाधनाचे खोकी आढळून आली. खोक्यांच्या पाठीमागील बाजूस गोव्यातील मद्याची खोकी लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात आली. हेही वाचा.व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर ट्रकमधून गोव्यातील मद्याची दोन हजार खोकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांची किंमत एक कोटी २८ लाख रुपये आहे. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह ट्रकही जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालयाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सागर दुर्वे, संदिप मांडवेकर आणि पथकाने ही कारवाई केली.