पुणे : गोव्यातील मद्याची तस्करी करुन राज्यात विक्री करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्साइज) अटक केली. इंदापूर परिसरात पाठलाग करुन दोघांना पकडण्यात आले. गोव्यातील स्वस्त मद्य प्लास्टिक ड्रममध्ये भरून ते राज्यात आणले जायचे. ड्रममधील मद्य बाटल्यांमध्ये भरुन त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातील पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माढा, तसेच साताऱ्यातील माण परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रेम सोमनाथ भांडवलकर (रा. बारामती), अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इंदापूर परिसरातील कांदलगाव परिसरातून मालवाहू वाहनातून गाेव्यातील मद्याची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने पाठलाग करुन वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात २५ ड्रम आणि मद्याच्या बाटल्यांचे एक हजार ४०० बुच सापडली.
आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसरातील रहिवासी असलेल्या अक्षय देशमुख याच्या घरावर छापा टाकला. तेथून गोव्यातील विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, दोन हजार बुच असा मुद्देमाल जप्त केला, तसेच सातारा जिल्ह्यातील माण परिसरात कारवाई करण्यात आली. गोव्यात विदेशी मद्य स्वस्त मिळते. गोव्यातील मद्याची तस्करी करुन त्याची राज्यात विक्री करण्यात येत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. उत्पादन शु्ल्क विभागाचे आयुक्त डाॅ. राजेश देशमुख, पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्य मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक शितोळे, सत्यवान गोगावले, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, प्रदीप झुंजारक यांनी ही कारवाई केली.
गोव्यातील विदेशी बनावटीचे मद्य ड्ममध्ये भरुन त्याची राज्यात छुप्या पद्धतीने विक्री केली. मद्य विक्रीतून मिळणारा महसूल बुडवून शासनाची फसवणूक केले जाते. यापुढील काळात मद्य तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. – अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे विभाग
