आगामी गणेशोत्सवासाठीचे नियोजन महापालिकेकडून सुरू झाले असून गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. फिरत्या हौदांबरोबरच १३५ स्थिर हौद विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या कालावधीत दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन हौदांची उभारणी केली जाते. त्यानुसार विसर्जन हौदांच्या उभारणीचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. गेल्यावर्षी फिरते विसर्जन हौद संकल्पना राबविताना गाड्या जागेवर थांबून असताना देखील ठेकेदाराचे पैसे देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यंदाही असेच प्रकार होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली जाईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला.

यंदा घनकचरा विभागाकडून १५० फिरते हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार शहरात एकूण २२५ फिरते विसर्जन हौद असतील. याशिवाय शहरात ठिकठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागात यंदा १३६ ठिकाणी विसर्जन हौद उभारण्यता येतील. स्थिर हौदांची स्वच्छता, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था यासह आदी खर्चास मान्यता देण्‍यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.