पुणे : वैचारिक मतभेदांमुळे दोघांना विभक्त होण्याची वेळ आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणऱ्या पत्नीने अभ्यास आणि दैनंदिन खर्चासाठी पोटगी मिळावी, असा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाने पतीची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पत्नीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, तसेच दैनंदिन खर्चासाठी ३० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले.

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आ. एन. खान यांनी याबाबतचे आदेस नुकतेच दिले. पोटगी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या महिला आणि तिच्या पतीत वैचारिक मतभेद निर्माण झाले. वैचारिक मतभेद आणि वादामुळे दोघेही विभक्त राहू लागले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलेने कौटुंबिक न्यायालयात पोटगी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला.

स्वतंत्र उत्पन्न नाही, तसेच राहणीमान, अभ्यास साहित्य, शैक्षणिक शुल्क, दैनंदिनी खर्च भागविणे कठीण जात असल्याने पाेटगी मिळावी, असा अर्ज तिने तिचे वकील ॲड. सोनल आरु, ॲड. प्राची जमदाडे, ॲड. अजय मोहोळ, ॲड. दीपाली अडसूळ यांच्या मार्फत कौटुंबिक न्यायलयात दाखल केला होता.

पतीच्या बाजूने वकिलानी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने कागदपत्रांची तपासणी केली. पतीचे उत्पन्न, पत्नीचा शैक्षणिक खर्च, आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन दरमहा ३० हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. ही रक्कम पत्नीचे शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.