पुणे : पाषाणकर ऑटोचे मालक प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यात प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांविरोधात अडीच कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

gautam pashankar
गौतम पाषाणकर (फोटो – पाषाणकर यांच्या फेसबुक वॉलवरून)

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि पाषाणकर ऑटोचे मालक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडीच कोटींची फसवणूक केल्याचा हा गुन्हा आहे. त्यांच्यावर मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी पैसे घेऊन देखील फ्लॅट नावावर केला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता कार्यालयात बोलवून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी गौतम पाषाणकर, रीनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र पंडितराव पाटील वय 42 रा. शिवाजीनगर असे फिर्यादीचे नाव आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गौतम पाषाणकर गायब झाले होते. जाताना त्यांनी सुसाईड नोटसारखी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. मात्र, अखेर त्यांना दुसऱ्या राज्यातून पोलिसांनी शोधून आणलं होतं. आता त्यांच्याविरोधात झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

नेमकं घडलं काय?

काही दिवसांपूर्वी झालेल्या या व्यवहारामध्ये पाषाणकर यांच्याकडून फ्लॅट घेण्यासाठी तक्रारदाराने त्यांना अडीच कोटींची रक्कम अदा केली होती. मात्र त्यानंतर देखील पाषाणकर यांनी फ्लॅट संबंधित व्यक्तीच्या नावे करून दिला नाही. त्यामध्ये टाळाटाळ सुरू झाली. विशेष म्हणजे तक्रारदाराने यासंदर्भात जाब विचारला असता त्याला थेट कार्यालयात बोलवून मारहाण आणि दमदाटी केली असून त्यात आपला पाय फ्रॅक्चर झाल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने आपल्या तक्रारीत केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासोबत रीनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नरेंद्र पाटील यांचा खराडी परिसरात प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सी बिल्डिंगमध्ये पी 101 आणि 102 हे फ्लॅट 2 कोटी 87 लाख रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्या सोबत ठरला होता. त्यानुसार फिर्याद नरेंद्र पाटील यांनी त्यापैकी वेळोवेळी अशी मिळून 2 कोटी 40 लाख रूपयांची रक्कम देखील दिली होती. मात्र, त्याच दरम्यान 101 क्रमांकाची सदनिका गणेश शिंदे, तर 102 क्रमांकाची सदनिका मनीषा गोरद यांच्या नावावर करण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

अचानक गायब झाले होते गौतम पाषाणकर!

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देखील गौतम पाषाणकर त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे चर्चेत आले होते. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर पुण्यातून अचानक गायब झाले होते. त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये गेल्या तीन वर्षांत व्यवसायात आपल्याला आलेल्या अपयशामुळे आणि नुकसानीमुळे आपल्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आपण हे पाऊल उचलत आहोत, त्यासाठी कुणालाही दोषी धरलं जाऊ नये, असं लिहून ठेवलं होतं. त्यामुळे पुण्यात सर्वत्र त्यांच्या गायब होण्याची चर्चा सुरू झाली होती.

पुणे : “७ दिवसांत अहवाल द्या”, १४ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी बालहक्क आयोगाचे आदेश!

यानंतर पुणे पोलिसांनी कोल्हापूर, कोकण आणि गोव्याचा परिसर पिंजून काढला. मात्र, पाषाणकरांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर २४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच, गायब झाल्यानंतर महिन्याभरानंतर पाषाणकर यांना जयपूरमधील एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्याच्या गणेशखिंड परिसरात पाषाणकर यांचं घर आहे. तिथूनच ते गायब झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune famous businessman builder gautam pashankar police filed case of cheating pmw

ताज्या बातम्या