सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील दोन पिता-पुत्र जोड्यांनी नुकतीच पंढरीची ‘सायकल वारी’ केली. सामाजिक व शारीरिक स्वास्थ्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने सुधीर लोखंडे आणि त्यांचा बारा वर्षांचा मुलगा सुमेध व संदीप धुमाळ आणि त्यांचा मुलगा श्लोक यांनी हडपसर ते पंढरपूर असा २०३ किलोमीटरचा सायकल प्रवास १४ तासांत पूर्ण केला. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेले भाविक वारकरी वर्षानुवर्षे पायी वारी करतात, पण आपण सायकलच्या माध्यमातून ही वारी करावी, अशी इच्छा बाळगून लोखंडे आणि धुमाळ पिता-पुत्रांनी ही सायकल वारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी लोखंडे आणि त्यांचे मित्र धुमाळ हे दोघेच जण ही सायकल वारी करणार होते. पण, नंतर मुलांचा उत्साह पाहून मुलांनाही बरोबर घेऊन जायचे, असा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानुसार सुमेध आणि श्लोक या दोघांना घेऊन सायकल वारी करायचे त्यांनी ठरवले. कॅम्पमधील बिशप स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारा सुमेधचा सायकल चालवण्याचा सराव सुरू होताच. या वारीसाठी सराव म्हणून सुमेधने शाळा प्रवासाबरोबरच हडपसर ते सिंहगड असा सायकल प्रवासही केला.

हेही वाचा…पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग सक्रिय.. तीन पथके, दोन रबर बोटी, रेस्क्यु उपकरणासह मदतीसाठी रवाना

सिंहगड पायथ्याला गेल्यानंतर त्याने सिंहगड ट्रेकही केला आणि पुन्हा सिंहगड पायथा ते हडपसर असा सायकलवर प्रवास केला. या सायकल प्रवासामुळे तो पंढरपूरची सायकल वारी व्यवस्थित करू शकेल, असा विश्वास सुमेधच्या वडिलांना वाटला. वारीसाठी हे सायकलवीर पहाटे तीन वाजता हडपसर येथून निघाले. हडपसरवरून निघाल्यानंतर पुढे यवतमध्ये आल्यावर अल्पशी न्याहरी आणि नंतर थेट पाटसपर्यंत सायकल रपेट त्यांनी केली. पाटसमध्ये थोडी विश्रांती घेऊन पुढे भिगवण व तेथून इंदापूरला जेवण, असे थांबे करत ही वारी चालली होती. प्रत्येक थांब्यांवर थांबल्यानंतर स्नायूंना आराम देण्यासाठी हे सायकलवीर ‘स्ट्रेचिंग’ करायचे. इंदापूरमध्ये जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून त्यांनी पुढे टेंभुर्णीमध्ये थांबा घेतला. टेंभुर्णीत ही मंडळी पोहोचत असतानाच पावसाला सुरुवात झाली आणि त्या पावसात २० किलोमीटरचा सायकलप्रवास करत ते सायंकाळी सहा वाजता पंढरपूर येथे पोहोचले. चढ-उतारांच्या रस्त्यांवरून सायकल चालविण्याचा वेगळा अनुभव मिळाल्याचे या सायकलवीरांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा…दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील उद्याचा पेपर लांबणीवर

पर्यावरण संवर्धन व शरीरस्वास्थ्याचा संदेश सायकल वारीतून पर्यावरण संवर्धन आणि शारीरिक स्वास्थ्याचा संदेश देण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या सायकलवीरांनी ‘भक्तिभावाची किमया न्यारी, सायकलवर पंढरीची वारी’ असे घोषवाक्यही तयार केले. सायकल चालवण्याने प्रदूषण कमी होण्यास जसा हातभार लागू शकतो, तसेच शरीरस्वास्थ्यदेखील उत्तम राहू शकते, असा संदेश त्यांनी या सायकल वारीच्या निमित्ताने दिला.

shriram.oak@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune father son duos complete 203 km cycle wari hadpsar to pandharpur promoting health and environment pune print news psg
Show comments