पुणे : विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या पुणे विभागातील ११ प्रमुख आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, परवान्याशिवाय चालणाऱ्या एका हॉटेलचा गाशा गुंडाळण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

प्रशासकीय पथकाने विभागातील हॉटेल्स, उपाहारगृहे आणि डेअरीजची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचा कारभार उघडकीस आला. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटक व झुरळांचा सुळसुळाट, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी दाखल्यांचा अभाव, पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष आणि मुदतबाह्य कच्च्या मालाचा सर्रास वापर अशा गंभीर त्रुटी या पाहणीत आढळून आल्या.

निलंबनाची ही कारवाई मुख्यतः सांगली जिल्ह्यातील विटा, वाळवा, पलूस, कडेगाव व आटपाडी परिसरातील आस्थापनांवर झाली. सांगलीतील विटा मधील काका वडापाव, श्रावणगिरी स्पंज डोसा, गोल्डन चहा, जॅक्सन डेअरी आणि खडा वडापाव सेंटर, क्रिस्टल गॉरमेट प्रा. लि. (वांगी व बांबवडे), गुरुकृपा चिकन प्लांट (कुंडल), हॉटेल यशराज (कामेरी), हॉटेल सह्याद्री (पेठ) आणि श्री गणेश हॉटेल (आटपाडी) या इतर ठिकाणांवर कारवाई करण्यात आली ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; सर्व व्यावसायिकांनी स्वच्छतेचे व कायद्याचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा याहून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा ‘एफडीए’ने दिला आहे.

विनापरवाना हॉटेलवर बंदी

या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील पुरंदर (काळेवाडी) येथील ‘मेसर्स अदिती व्हेज’ हे हॉटेल अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कोणताही वैध परवाना न घेता चालवले जात असल्याचे उघड झाले. प्रशासनाने हे हॉटेल तत्काळ बंद करण्याचे कडक निर्देश दिले.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; सर्व व्यावसायिकांनी स्वच्छतेचे व कायद्याचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा याहून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा एफडीएने दिला आहे. तसेच ग्राहकांनाही काही तक्रारी असतील तर त्यांनी त्वरित एफडीएच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तक्रार करावी असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.